भूतबाधा उतरवण्याच्या नावाखाली भोंदूबाबाचा महिलेवर बलात्कार; व्हिडिओ रेकॉर्ड करून ब्लॅकमेल!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2025 17:45 IST2025-10-14T17:45:04+5:302025-10-14T17:45:44+5:30
Uttar Pradesh Kaushambi Rape News:उत्तर प्रदेशातील कौशाम्बी जिल्ह्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे.

भूतबाधा उतरवण्याच्या नावाखाली भोंदूबाबाचा महिलेवर बलात्कार; व्हिडिओ रेकॉर्ड करून ब्लॅकमेल!
उत्तर प्रदेशातील कौशाम्बी जिल्ह्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. एका तांत्रिकाने मुलाच्या उपचारासाठी आलेल्या महिलेवर भूतबाधा उतरवण्याच्या नावाखाली बलात्कार केला. एवढेच नव्हे, तर आरोपीने या कृत्याचे चित्रीकरण करून व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन पीडितेला गप्प बसवले.
कौशाम्बी जिल्ह्यातील महेवा घाट पोलिस स्टेशन परिसरातील ही घटना आहे. पीडितेचा पती दिल्लीत खाजगी नोकरी करतो, तर पीडित महिला प्रयागराजच्या विमानतळ पोलिस स्टेशन परिसरातील रहिवासी आहे. त्यांचा ५ वर्षांचा मोठा मुलगा आजारी असल्यामुळे, गावकऱ्यांच्या सांगण्यावरून ते उपचारांसाठी तांत्रिकाकडे गेले. पश्चिमशरीरा परिसरातील बकरगंज गावातील रहिवासी असलेला धीरेंद्र सरोज नावाचा तांत्रिक जादूटोण्याने आजार बरे करतो, असे सांगण्यात आले. त्यानुसार, २ सप्टेंबर रोजी पीडित महिला तिच्या मुलावर उपचार करण्यासाठी या तांत्रिकाकडे गेली.
मादक पदार्थ देऊन केले कृत्य
पोलिसांना दिलेल्या तक्रारीनुसार, भूतबाधा उतरवण्याच्या बहाण्याने तांत्रिकाने पाण्यात मादक पदार्थ मिसळून ते महिलेला पिण्यास दिले. हे पाणी पिल्यावर महिला बेशुद्ध पडली. शुद्धीवर आल्यावर तिला आपल्यावर झालेल्या अत्याचाराची जाणीव झाली.
व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी
या क्रूर घटनेनंतर आरोपी धीरेंद्र सरोजने महिलेला दमदाटी केली. तसेच याबाबत कुठेही वाच्यता केल्यास तिचे अश्लील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करेल, अशीही धमकी दिली. इतकेच नाही, तर आरोपीने महिलेचे सिमकार्ड तोडून फेकले, ज्यामुळे तिला तिच्या दिल्लीतील पतीशी संपर्क साधता आला नाही. मात्र, पीडितेने कसाबसा पतीशी संपर्क साधून घडलेली आपबिती सांगितली. त्यानंतर पती तातडीने दिल्लीहून परतला आणि रविवारी त्यांनी पत्नीसह पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली.
एसपींचे कठोर कारवाईचे आदेश
या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन, पोलिस अधीक्षक (एसपी) राजेश कुमार यांनी तात्काळ दखल घेतली. त्यांनी महेवा घाट पोलिसांना आरोपी धीरेंद्र सरोजविरुद्ध तातडीने एफआयआर नोंदवून कठोर कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. सध्या पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत आणि आरोपीला पकडण्यासाठी शोधमोहीम सुरू आहे.