Crime: “तुझे दात चांगले नाहीत,निघून जा! नाही तर, मारून टाकीन” बायकोचा छळ, गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2025 10:37 IST2025-12-01T10:34:36+5:302025-12-01T10:37:39+5:30
Uttar Pradesh Crime: हुंड्यात स्कॉर्पिओ न मिळाल्याने नवविवाहित महिलेचा छळ केल्याची घटना उघडकीस आली.

Crime: “तुझे दात चांगले नाहीत,निघून जा! नाही तर, मारून टाकीन” बायकोचा छळ, गुन्हा दाखल
उत्तर प्रदेशातील बांदा जिल्ह्यातील एका नवविवाहित महिलेने तिच्या पतीने आणि सासरच्या लोकांनी मानसिक व शारीरिक छळ केल्याबद्दल पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. महिलेच्या तक्रारीनुसार, पतीने हुंड्यात स्कॉर्पिओ न मिळाल्याने तिचा शारिरीक छळ केला. तसेच 'तुझे दात चांगले नाहीत' असे म्हणून तिला घरातून निघून जाण्यास सांगितले, अन्यथा जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी तिच्या पतीसह चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
नेमके काय घडले?
मिळालेल्या माहितीनुसार, कोतवाली नगर परिसरात राहणाऱ्या पीडितेचे लग्न जुलै २०२४ मध्ये झाले. पीडितेच्या वडिलांनी ऐपतीनुसार हुंडा दिला. मात्र, लग्नाच्या अवघ्या पाच दिवसांनंतर एका कंपनीत मॅनेजर असलेल्या तिच्या पतीने हुंड्यात स्कॉर्पिओ मागितली. हुंडा न मिळाल्याने पती आणि सासरच्या इतर लोकांनी तिचा मानसिक आणि शारीरिक छळ करण्यास सुरुवात केली. तिला दोन दिवस उपाशी ठेवण्यात आले आणि सतत तिचा अपमान करण्यात आला. तसेच तुझे दात चांगले नाहीत, येथून निघून जा, नाहीतर मी तुला मारून टाकीन, अशीही पतीने तिला धमकी दिली.
स्कॉर्पिओ द्या किंवा मुलीला घेऊन जा
सासरच्या मंडळींनी पीडितेच्या आई-वडिलांना स्पष्टपणे सांगितले की, एकतर स्कॉर्पिओ आणा किंवा मुलीला कायमचे परत घेऊन जा. हे ऐकून पीडितेचे वडील आजारी पडले आणि सप्टेंबर २०२५ मध्ये त्यांचे निधन झाले. वडिलांच्या मृत्युनंतर जेव्हा महिला तिच्या सासरच्या घरी परतली, तेव्हा सासरच्या लोकांनी तिला घरात प्रवेश दिला नाही. त्यानंतर पीडित महिलेने पोलीस ठाणे गाठून सासरच्या मंडळींविरोधात तक्रार दिली.
पतीसह चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल
पीडितेच्या तक्रारीवरून, महिला पोलीस ठाण्यात तिच्या पतीसह चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिला ठाणे प्रभारी मोनी निषाद यांनी सांगितले की, महिलेची तक्रार मिळाल्यानंतर तिच्या सासरच्या मंडळींविरोधात हुंडा छळ, धमकी आणि इतर गंभीर आरोपांच्या विविध कलमांखाली गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला. तपासाच्या आधारावर पुढील कारवाई केली जाईल, असे पोलिसांचे म्हणणे आहे.