ऐकावं ते नवलच! डॉक्टर असल्याचं सांगून लग्न केलं अन् निघाला डिलिव्हरी बॉय; १५ लाख पाण्यात
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2023 17:52 IST2023-12-01T17:52:05+5:302023-12-01T17:52:39+5:30
मुलीकडच्या मंडळींना प्रभावित करण्यासाठी डॉक्टर असल्याचं सांगून युवकाने लग्न ठरवले.

ऐकावं ते नवलच! डॉक्टर असल्याचं सांगून लग्न केलं अन् निघाला डिलिव्हरी बॉय; १५ लाख पाण्यात
गाझियाबाद : उत्तर प्रदेशातील गाझियाबाद येथून एक अनोखी घटना उघडकीस आली आहे. हा प्रकार हास्यास्पद वाटत असला तरी तितकाच चिंतेत टाकणारा आहे. मुलीकडच्या मंडळींना प्रभावित करण्यासाठी डॉक्टर असल्याचं सांगून युवकाने लग्न ठरवले. पण, लग्न झाल्यानंतर सत्य समोर येताच एकच खळबळ माजली. संबंधित तरूणीने केलेल्या आरोपानुसार, युवकाने डॉक्टर असल्याचं सांगून फसवणूक केली. त्याने मेट्रोमोनियल साईटवर डॉक्टरच्या वेशातील त्याचा फोटो पोस्ट करून तिला आकर्षित केले.
दरम्यान, मुलीच्या नातेवाईकांनी या लग्नासाठी १५ लाख रूपये खर्च केला होता. खरं तर लग्नानंतर उघडकीस आले की, मुलगा कमी शिकलेला असून झोमॅटोमध्ये डिलिव्हरी बॉयचे काम करत आहे. लग्नाच्या दोन वर्षांनंतर मुलीने सर्व प्रकार उघड केला आणि 'वन स्टॉप क्रायसेस सेंटर'मध्ये तक्रार नोंदवली. संबंधित तरूण तिचा वारंवार छळ करत असे. तसेच तिला मारहाण केल्याने पीडित तरूणीचा संयम सुटला अन् तरूणाचा अर्थात तिच्या पतीचा खरा चेहरा समोर आला.
२ वर्षांपूर्वी लग्न अन् ...
'वन स्टॉप क्रायसेस सेंटर'च्या केंद्रातील अधिकाऱ्यांनी सांगितले की, पीडित तरूणीचे २०२१ मध्ये लग्न झाले होते. दोन वर्ष तिचा छळ होत होता. संबंधित तरूणाला समज देऊनही काही फरक नसल्याने जवळच्या विजयनगर पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
आमच्याकडे बहुतांश तक्रारी अशा येतात, ज्यामध्ये कौटुंबिक कलह, पती-पत्नीचा वाद अशी काही प्रकरणे असतात. यातील अनेक प्रकरणांमध्ये महिला शांत राहिल्याने गैरफायदा घेतला गेल्याचे निदर्शनास आले. काही प्रकरणांमध्ये तर संबंधित महिलेला तिच्या माहेरच्यांकडून पाठिंबा न मिळाल्याने तिचे खच्चीकरण होते. मात्र, हळू हळू स्थिती बदलत असून आमच्या माध्यमातून आम्ही न्याय देण्याचा प्रयत्न करत आहे. पती-पत्नीचा वाद असे प्रकरण असेल तर मध्यस्थी करून वाद मिटवण्यावर आम्ही भर देतो, असे 'वन स्टॉप क्रायसेस सेंटर'च्या व्यवस्थापक प्रिती मलिक यांनी सांगितले.