भाजी चांगली बनवली नाही म्हणत पत्नीला जिवंत जाळले; मृत्यूपूर्वी महिलेने सांगितली आपबीती
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2023 19:23 IST2023-08-14T19:23:01+5:302023-08-14T19:23:48+5:30
मृत महिलेचा पती तिला सातत्याने मारहाण करायचा. घटनेच्या दिवशीही त्याने बेदम मारहाण केली.

भाजी चांगली बनवली नाही म्हणत पत्नीला जिवंत जाळले; मृत्यूपूर्वी महिलेने सांगितली आपबीती
UP Crime News: उत्तर प्रदेशच्या बांदामधून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. पत्नीने बनवलेली भाजी न आवडल्याने पतीने रागाच्या भरात पत्नीला जिवंत जाळले. मृत्यूपूर्वी जखमी पत्नीने मॅजिस्ट्रेटसमोर तिच्यावर झालेल्या अत्याचाराची संपूर्ण घटना सांगितली. हे प्रकरण समोर आल्यानंतर सर्वांनाच धक्का बसला आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
मृत महिला आपल्या पतीसोबत बांदा नगर कोतवाली अंतर्गत येणाऱ्या खोतला मोहल्ला येथे राहायची. जोगमाया(30) असे या मृत महिलेचे नाव आहे. तिचा पती मुकेश तिला अनेकदा मारहाण करायचा. दैनंदिन गोष्टीवरुन त्यांच्यात वाद व्हायचे आणि पती जोगमायाचा खूप छळ करायचा. रविवारी आरोपी मुकेश दारुच्या नशेत घरी आला आणि त्याने पत्नीला बेदम मारहाण केली.
महिलेच्या कुटुंबीयांनीही त्याला अनेकवेळा समजावले पण तो सुधरला नाही. रविवारी त्याने पत्नीला भाजी नीट केली नाहीस म्हणून मारहाण करायला सुरुवात केली. यानेही त्याचे समाधान झाले नाही म्हणून त्याने रॉकेल ओतून पत्नीला जिवंत जाळले. मृत्यूपूर्वी महिलेने मॅजिस्ट्रेटसमोर सर्व गोष्टीचा उलगडा केला.
अतिरिक्त पोलीस अधीक्षक गोविंद पाल यांनी याला दुजोरा दिला आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी राणी दुर्गावती मेडिकल कॉलेजमध्ये पाठवला. याबाबत पोलीस अधीक्षक अंकुर अग्रवाल यांच्याशी चर्चा केली असता, याप्रकरणी आरोपीवर कडक कारवाई करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.