घराणेशाहीनेच बिहारला अराजकता व गुंडागर्दीच्या दरीत ढकलले; योगी आदित्यनाथ यांचा हल्ला
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2025 19:26 IST2025-11-10T19:24:58+5:302025-11-10T19:26:22+5:30
राजद आणि काँग्रेसची सरकारे असताना बिहारमध्ये गुन्हेगारी वाढली. त्यांच्यामुळे बिहार साक्षरतेच्या बाबतीत मागे ढकलले गेले, अशी टीका मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केली.

घराणेशाहीनेच बिहारला अराजकता व गुंडागर्दीच्या दरीत ढकलले; योगी आदित्यनाथ यांचा हल्ला
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी एका सभेत काँग्रेस आणि राजदवर जोरदार हल्ला चढवला. “घराणेशाही व्यवस्थे'ने बिहारमध्ये जाती-जातींमध्ये भांडणं लावून अराजकता आणि गुंडागर्दीच्या दरीत ढकलले. बिहारच्या तरुणांसमोर अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला. इथल्या गरिबांना उपाशी ठेवण्यात आलं, तर सरकारी खजिन्याची लूट करण्यात आली. मोठमोठ्या घोषणा करत राजद-काँग्रेसची महाआघाडी फसवणूक करण्यासाठी आलेली आहे. जे तुमची जमीन हडपतात, ते नोकऱ्या काय देणार? जनावरांचा चारा खाणारे विकासाच्या गप्पा मारत आहेत. विकास, गरिबांचं कल्याण आणि श्रद्धेचा सन्मान हे कधीच त्यांच्या अजेंड्यावर नव्हतं", अशी टीका मुख्यमंत्री आदित्यनाथ यांनी केली.
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ बिहारमधील सुपौल जिल्ह्यातील छातापूरच्या लक्ष्मी रघुनाथ सिंह उच्च विद्यालयाच्या मैदानावर सभेत बोलत होते.
“काँग्रेस-राजदने बिहारला जंगलराज दिले”
मुख्यमंत्री योगी म्हणाले, "बिहार ही भक्ति, शक्ति आणि ज्ञानाची भूमी आहे. नालंदा विद्यापीठासारख्या संस्थेने जगाला ज्ञान दिले, पण काँग्रेस आणि राजदच्या पापांमुळे बिहार साक्षरतेत सर्वात खालच्या स्थानी पोहोचला. त्यांच्याच सरकारच्या काळात बिहार ‘जंगलराज’ म्हणून ओळखलं जाऊ लागलं."
"१४ नोव्हेंबरला जेव्हा ईव्हीएमचे बटण दाबले जातील, तेव्हा संपूर्ण बिहारमध्ये ‘फिर एक बार एनडीए सरकार’चा नारा घुमेल”, असा विश्वाास योगी आदित्यानाथ यांनी व्यक्त केला.
"खानदानी माफियांना सत्ता देऊ नका"
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले, "हे खानदानी लूट करणारे पुन्हा सत्तेत यायचा प्रयत्न करत आहेत. ते बिहारमध्ये पुन्हा जंगलराज आणू इच्छितात. उत्तर प्रदेशमध्ये आम्ही आधी सुरक्षा दिली, मग विकास केला. गुंडागर्दी करणाऱ्यांना यमराजाचे तिकीट देण्याचे आम्ही ठरवलं आहे. बुलडोजर चालला की रस्ते बनतात, विकास वाढतो आणि माफियांची हाडं तुटतात", असा हल्ला त्यांनी केला.
"राजदच्या काळात बिहारमध्ये ३० हजारांहून अधिक अपहरणाच्या घटना घडल्या. व्यापारी, डॉक्टर, अभियंते, मुली कोणीही सुरक्षित नव्हतं. मागील २० वर्षांत बिहारमध्ये सुशासनाची पायाभरणी झाली आहे. आज बिहारचा तरुण सनदी सेवेमध्ये, बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये आणि स्वतःच्या स्टार्टअपमधून जगभरात नाव कमावत आहे. ही विकासाची गती अखंड सुरू राहिली पाहिजे", असे आवाहन योगींनी केले.
"राम-जानकी मार्गाने बिहारचा गौरव वाढतोय"
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले, "अयोध्येमध्ये भव्य राम मंदिर उभारल्यानंतर एनडीए सरकार आता सीतामढीमध्ये माता जानकीचे मंदिर उभारत आहे. अयोध्या-सीतामढी मार्गासाठी ६,१५५ कोटी दिले आहेत. राम-जानकी मार्ग बांधला जातोय. काँग्रेस आणि राजद कधीच हे करू शकले नसते. त्यांनी भारत, संत आणि सामान्य जनतेचा अपमान केला. ते म्हणतात राम-कृष्ण झालेच नाहीत", अशी टीका योगींनी काँग्रेस आणि राजदवर केली.