ठाण्यात गॅस गळतीमुळे लागलेल्या आगीत महिला जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2021 21:00 IST2021-10-08T20:59:16+5:302021-10-08T21:00:04+5:30
Women Injured :

ठाण्यात गॅस गळतीमुळे लागलेल्या आगीत महिला जखमी
ठाणे : ढोकाळी रोड येथील नार्वेकर चाळीतील जनसेवा या पोळीभाजी केंद्रात गॅस गळती होऊन शुक्रवारी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास लागलेल्या आगीत ढोकाळी गणेशनगर येथील अनिता अशोक जयस्वाल (३२) ही महिला जखमी झाली आहे.
तिच्या उजव्या हाताला २० टक्के भाजले असून तिला जवळच्या रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. हे पोळीभाजी केंद्र तळ अधिक एक मजली घरात असून ते घर चंद्रकांत नार्वेकर यांच्या मालकीचे आहे. ते त्यांनी शोभा रंगनाथ शिंदे यांना भाडेतत्वावर दिलेले आहे. या घटनेची माहिती मिळताच, ठाणे महापालिका अग्निशमन दल आणि प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन विभागाने घटनास्थळी धाव घेतली. यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसून अनिता यांच्या हाताला भाजले असून त्यांना खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले आहे. तसेच आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश असून या ठिकाणी एक फायर इंजिन पाचारण केले होते अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन अधिकारी संतोष कदम यांनी दिली.