लोकमत न्यूज नेटवर्क
जव्हार : विक्रमगड तालुक्यातील एका महिलेची तीन दिवसांपूर्वी कालावधीपूर्व प्रसूती झाल्याने नवजात बालकाला पुढील उपचारासाठी जव्हार कुटीर रुग्णालयातून नाशिकच्या खासगी रुग्णालयात पाठविण्यात आले. मात्र, जव्हार, मोखाडा, विक्रमगडमधील रुग्णांना नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात येते. असे असताना एका ओल्या बाळंतिणीला बाळासह नाशिकमधील खासगी रुग्णालयात पाठविण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. या घटनेच्या चौकशीची मागणी आता होत आहे.
नाशिकच्या खासगी रुग्णालयात गेल्यानंतर बाळाच्या आई-वडिलांनी एका व्यक्तीकडे उसनवारी पैसे मागितल्यानंतर हा प्रकार लक्षात आला. विक्रमगडमधील पूजा मिलिंद गडग (वय २०, रा. झडपोली) या महिलेची प्रसूती सातव्या महिन्यात झाली. यामुळे बाळ अशक्त जन्माला आले. त्यामुळे त्याच्या फुप्फुसाची क्षमता वाढविण्यासाठी त्याच्यावर पुढील उपचाराची आवश्यकता होती.
याबाबत पत्रकारांनी जव्हार रुग्णालयातील डॉक्टरांना विचारले असता नाशिकच्या संबंधित खासगी रुग्णालय प्रशासनाशी समन्वय साधून बालकावर पूर्णपणे मोफत उपचार केल्याचा दावा आता जव्हार कुटीर रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी आणि वैद्यकीय अधीक्षक करीत आहेत.
महागडी औषधे परवडणार का?
आयुष्मान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेमधून या ठिकाणी उपचार होतात. त्यामुळे त्या रुग्णाला तेथे पाठविल्याचा दावा जव्हार कुटीर रुग्णालयाने केला आहे. मात्र, खासगी रुग्णालयात मोफत उपचार जरी झाले तरी काही महागडी औषधे किंवा जेवणाचे बिल हे रुग्णाला किंवा नातेवाइकांना परवडेल का? याचे उत्तर वैद्यकीय अधिकाऱ्यांकडे आहे का? असा सवाल नागरिकांनी केला आहे. दरम्यान, याबाबत जव्हार रुग्णालयातील बालरोगतज्ज्ञ डॉ. कावळे यांनी खासगी हॉस्पिटलमध्येदेखील मोफत उपचार होतात, असे सांगितले. तसेच आयुष्मान प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेतून मंजुरी मिळालेली नसतानाही बाळाच्या पालकांना एक रुपयाही खर्च करावा लागला नाही, असा दावाही केला.
याआधीसुद्धा असे अनेक रुग्ण या हॉस्पिटलमध्ये पाठविल्याची चर्चा आहे. त्यामुळे यामागे या दोन्ही रुग्णालयांतील डॉक्टर किंवा प्रशासनाचे काही आर्थिक संबंध तर नाही ना ? याचीदेखील चौकशी करणे गरजेचे आहे.
ज्ञानेश्वर (शिवा) सांबरे,
माजी उपाध्यक्ष जिल्हा परिषद, पालघर.याबाबत मला अनेक फोन आले. मी माहिती घेत आहे. मात्र, काही वेळा लहान बालकांना पुढील उपचार करण्यासाठी नाशिकच्या खासगी रुग्णालयात पाठवले जाते. मात्र, तिथेही मोफत उपचार होतात. तरीसुद्धा मी या घटनेची माहिती घेतो.
डॉ. उमेश पाटील,
वैद्यकीय अधीक्षक, कुटीर रुग्णालय.
Web Summary : Jawahar hospital sent a new mother and her baby to a private Nashik hospital, raising questions. Despite claims of free treatment under government schemes, concerns arise about expenses. An investigation is demanded into potential doctor-administration ties.
Web Summary : जवाहर अस्पताल ने एक नवजात शिशु और उसकी माँ को नासिक के एक निजी अस्पताल में भेजा, जिससे सवाल उठ रहे हैं। सरकारी योजनाओं के तहत मुफ्त इलाज के दावों के बावजूद, खर्चों को लेकर चिंताएं हैं। डॉक्टर-प्रशासन के संभावित संबंधों की जांच की मांग की गई है।