Palghar: पाणीटंचाईने प्रचंड हाल! हंडाभर पाण्यासाठी महिलांना जागावी लागते रात्र
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2025 07:29 IST2025-04-15T07:29:28+5:302025-04-15T07:29:51+5:30
Water Crisis Palghar: पाईपमध्ये साचलेले पाणी नळातून कधी येईल आणि आपला नंबर लागून हंडाभर पाणी कधी मिळेल? यासाठी महिला रात्रभर रांग लावून बसलेल्या पाहायला मिळत आहेत.

Palghar: पाणीटंचाईने प्रचंड हाल! हंडाभर पाण्यासाठी महिलांना जागावी लागते रात्र
वाडा : वाडा तालुक्यातील हरोसाळे ग्रामपंचायतीच्या हद्दीतील गावठाण पाडा व उंबरोठे ग्रामपंचायत हद्दीतील नदी पाडा येथील विहिरींनी तळ गाठल्याने दोन-तीन हंडे पाण्यासाठी येथील महिलांना अख्खी रात्र जागून काढावी लागत आहे. पाईपमध्ये साचलेले पाणी नळातून कधी येईल आणि आपला नंबर लागून हंडाभर पाणी कधी मिळेल? यासाठी महिला रात्रभर रांग लावून बसलेल्या पाहायला मिळत आहेत.
या गावपाड्यांसाठी जलजीवन योजना मंजूर असली, तरी गेल्या दोन-अडीच वर्षांपासून ती अपूर्ण असल्याचा फटका येथील ग्रामस्थांना बसत आहे.
वाडा शहरापासून अवघ्या तीन किलोमीटर अंतरावर हरोसाळे ही ग्रामपंचायत आहे. या ग्रामपंचायतीच्या हद्दीत गावठाण पाडा असून, या पाड्याची लोकसंख्या २५० ते ३०० च्या आसपास आहे. या पाड्यात एक विहीर असून, तिच्या पाण्याने सध्या तळ गाठला आहे.
जागरणानंतर पोटाची खळगी भरण्याचा संघर्ष
येथे असलेली कुपनलिका वर्षभरापासून नादुरुस्त असल्याने नागरिकांना पाण्यासाठी वणवण फिरावे लागत आहे. हंडाभर पाणी अख्खी रात्र जागून भरावे लागत आहे.
रात्रीच्या जागरणानंतर सकाळी पोटाची खळगी भरण्यासाठी कामावर जावे लागत असल्याने नागरिक संताप व्यक्त करत आहेत. अशीच परिस्थिती उंबरोठे गावाच्या हद्दीत असलेल्या नदी पाडा येथे आहे. या पाड्यावर ६० ते ७० कुटुंबे राहतात.
तीन हंडे भरल्यानंतर पुन्हा प्रतीक्षा
या पाड्यासाठी एकमेव कुपनलिका असून, या कुपनलिकेवर पाणी भरण्यासाठी नंबर लावावा लागतो. दोन-तीन हंडे भरून झाल्यानंतर काही वेळ थांबावे लागते.
पुन्हा कुपनलिकेत पाणी साचल्यावर दुसऱ्याचा नंबर येतो, अशी विदारक परिस्थिती वाडा तालुक्यात पाहायला मिळत आहे.