त्रिपुरारी पौर्णिमेला दिसणार 'सुपर मून'चा अनोखा सोहळा
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2025 10:25 IST2025-10-30T10:25:14+5:302025-10-30T10:25:43+5:30
Supermoon 2025: चंद्र पृथ्वीच्या सर्वात जवळ येणार असल्याने त्याचे रूप अधिक मोठे

त्रिपुरारी पौर्णिमेला दिसणार 'सुपर मून'चा अनोखा सोहळा
ठाणे : येत्या बुधवारी, ५ नोव्हेंबर रोजी त्रिपुरारी पौर्णिमेच्या रात्री आकाशात एक अद्भूत आणि तेजस्वी दृश्य अनुभवायला मिळणार असून सुपर मूनचे दर्शन घडणार आहे. पंचांगकर्ते व खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी दिलेल्या माहितीनुसार, या दिवशी चंद्र पृथ्वीच्या सर्वात जवळ येणार असल्याने त्याचे रूप अधिक मोठे, तेजस्वी आणि मनोहारी दिसणार आहे.
सोमण यांनी सांगितले की, पौर्णिमेच्या दिवशी जर चंद्र पृथ्वीच्या जवळ असेल तर त्याचे बिंब सामान्यपेक्षा अधिक मोठे व उजळ दिसते. तसेच सुंदर सुपर मून बुधवारी रात्री पाहायला मिळेल.
चंद्राचे बिंब ३० टक्के तेजस्वी असणार
सामान्यतः चंद्र पृथ्वीपासून ३ लाख ८४ हजार किमी अंतरावर असतो. मात्र, या विशेष रात्री तो केवळ ३ लाख ५६ हजार ८३४ किमी. अंतरावर येईल. त्यामुळे त्याचे बिंब आकाराने सुमारे १३ टक्के मोठे आणि ३० टक्के अधिक तेजस्वी असेल.
पौर्णिमेच्या दिवशी जर चंद्र पृथ्वीपासून दूर असेल तर त्याचे बिंब लहान आणि कमी उजळ दिसते, त्याला 'मायक्रो मून' म्हणतात. पण, बुधवारी दिसणारा सुपर मून हा त्याच्या नेमक्या उलट, तेजस्वी, भव्य आणि मोहक रुपात दिसेल."
हा सुपर मून सायंकाळी ५:४४ वाजता पूर्वेकडे उगवेल आणि संपूर्ण रात्रभर आकाशात झळकत राहील. यापुढील सुपर मून गुरुवार, ४ डिसेंबर रोजी दत्त जयंतीच्या रात्री पाहायला मिळणार असल्याचेही सोमण यांनी सांगितले.