आज थांबवले नाही तर १०० टक्के उद्या...; मराठी बोलण्यास नकार दिल्यावरुन मारहाण, मीरा-भाईंदरमध्ये व्यापाऱ्यांचा कडकडीत बंद
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2025 14:52 IST2025-07-03T14:52:32+5:302025-07-03T14:52:59+5:30
मीरा रोड येथे मनसे कार्यकर्त्यांनी दुकानदाराला मारहाण केल्यामुळे व्यापाऱ्यांनी बंद पुकारला आहे.

आज थांबवले नाही तर १०० टक्के उद्या...; मराठी बोलण्यास नकार दिल्यावरुन मारहाण, मीरा-भाईंदरमध्ये व्यापाऱ्यांचा कडकडीत बंद
Mira Bhayandar Trader Protest Against MNS: ठाण्यातील मीरा रोड येथे मराठी बोलण्याच्या वादातून मनसे कार्यकर्त्यांनी एका दुकानदाराला मारहाण केल्याच्या प्रकरणाने आता वेगळं वळण घेतलं आहे. दुकानदाराने मराठी बोलण्यास नकार देताच मनसे कार्यकर्त्यांनी त्याला मारहाण केली होती. आता या मारहाणीच्या निषेधार्थ आज संपूर्ण मीरा-भाईंदर शहरातील व्यावसायिक आणि व्यापाऱ्यांकडून दुकाने बंद ठेवण्यात आली आहेत. दुसरीकडे, पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करत सात जणांवर कारवाई केली आहे. दुकानदाराला मनसे कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याने मीरा भाईंदर येथील व्यापाऱ्यांनी एल्गार पुकारला आहे.
मीरा रोड येथील शांती पार्क परिसरात असलेल्या जोधपूर स्वीट्स अँड नमकीन या दुकानाच्या मालकाला दोन दिवसांपूर्वी मनसे कार्यकर्त्यांकडून मारहाण करण्यात आली होती. त्यानंतर गुरुवारी एकता मंचच्या व्यापाऱ्यांकडून निषेध आंदोलन करण्यात आलं. व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवत मारहाण झालेल्या ठिकाणी एकत्र येऊन या घटनेचा निषेध केला. यावेळी पोलिसांकडून आंदोलकांना समजण्याचा प्रयत्न करण्यात आला. दुसरीकडे मनसे नेते अविनाश जाधव यांनी हा मोर्चा भाजप पुरस्कृत असल्याचे म्हटलं.
आज थांबवले नाही तर उद्या कोणासोबतही हे घडेल
या घटनेनंतर व्यापारी संघटनेने निवेदन काढून दुकाने बंद ठेवून आंदोलन करण्याची सूचना केली आहे. "मीरा-भाईंदरमधील सर्व व्यावसायिकांना विनंती आहे की त्यांनी मीरा-भाईंदरमधील जोधपूर स्वीट येथे झालेल्या गुंडगिरी आणि गैरवर्तनाचा निषेध करावा. त्यांनी भाषेचे विष पसरवण्याचा प्रयत्न केला आहे. ही घटना भविष्यात आपल्या सर्व व्यावसायिकांसाठी गंभीर चिंतेची बाब आहे. ही कोणत्याही जाती, समुदाय किंवा राज्याची बाब नाही. म्हणूनच,मीरा-भाईंदरमधील सर्व व्यावसायिकांनी त्यांची दुकाने बंद ठेवून याविरुद्ध कठोर कारवाई करण्याची मागणी करावी, जेणेकरून भविष्यात अशा घटना घडू नयेत. जर आपण सर्वांनी आज ही घटना थांबवली नाही, तर येणाऱ्या काळात इतर कोणासोबतही घडण्याची शक्यता आहे. जर काही योग्य पावले उचलली नाहीत तर अशी घटना सर्वांसोबत घडण्याची १०० टक्के शक्यता आहे. म्हणून अशा लोकांवर योग्य ती कारवाई करण्यासाठी योग्य ती पावले उचलण्याची तीव्र गरज आहे," असं व्यापारी संघटनेने म्हटलं आहे.
पोलिसांनी काय म्हटलं?
"दोन दिवसांपूर्वी एका व्यापाऱ्यावर हल्ला झाला. या प्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आला आहे. आम्ही ७ जणांवर कारवाई केली आहे. आज या प्रकरणाबाबत काही लोक येथे जमले होते. आम्ही त्यांना कारवाई करत असल्याचे सांगितले आहे. सर्वजण शांततेत समन्वय साधत आहेत. मी सर्वांना कोणत्याही अफवा पसरवू नये असे आवाहन करतो," असं पोलीस उपायुक्त प्रकाश गायकवाड म्हणाले.