सुट्टीचा आनंद लुटण्यासाठी मुंबईहून पालघरला आले, पोहायला पाण्यात उतरले आणि एकावर मृत्युने घातली झडप
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2026 20:23 IST2026-01-10T20:21:52+5:302026-01-10T20:23:11+5:30
सुट्टी असल्यामुळे मुंबईहून पालघरमधील एका फार्महाऊसवर आलेल्या मित्रांपैकी एकाचा मृत्यू झाला. पालघर जिल्ह्यातील चिल्हार परिसरात ही घटना घडली.

सुट्टीचा आनंद लुटण्यासाठी मुंबईहून पालघरला आले, पोहायला पाण्यात उतरले आणि एकावर मृत्युने घातली झडप
सुट्टी असल्याने मुंबईतून सहा-सात मित्रा पालघर जिल्ह्यातील मनोरजवळील चिल्हारमध्ये गेले होते. फार्महाऊसमध्ये ते थांबले होते. पण, फिरून झाल्यानंतर पोहायला जाण्याचा त्यांचा निर्णय चुकला. कारण यात एकाचा बुडून मृत्यू झाला.
माहितीनुसार, चिल्हार परिसरात असलेल्या खाणीच्या पाण्यात ते पोहायला उतरले होते. त्याचवेळी एकाचा बुडून मृत्यू झाला. मंगळवारी घडलेली घटना आता समोर आली.
फुझेल सय्यद (वय ३४) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. तो मुंबईतील राहत होता. फुझेल त्याच्या सहा-सात मित्रांसह पालघर जिल्ह्यातील चिल्हार ग्रीन फिल्ड परिसरात असलेल्या एका फार्महाऊसवर थांबला होता.
निसर्ग पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी ते फिरायला गेले होते. मंगळवारी दुपारपर्यंत सगळे मित्र फिरले. त्यानंतर दुपारी फार्महाऊस जवळच असलेल्या एका खाणीतील पाणी बघून त्यांना पोहण्याचा मोह झाला.
मोठ्या प्रमाणात दगडाचे उत्सनन करण्यात आलेले असल्याने खाणीमध्ये पाणी भरपूर भरलेले होते. त्यात सुरूवातीला काहीजण उतरले. त्यात फुझेलही होता. पाण्यात उतरल्यानंतर खोलीचा अंदाज चुकला आणि फुझेल बुडू लागला.
इतर मित्रांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला. पण, पाण्याच्या खोलीमुळे कुणालाही त्याला बाहेर काढता आले नाही आणि त्याचा बुडून मृत्यू झाला. घटनेची माहिती परिसरातील नागरिकांना मिळाली. त्यांनी घटनास्थळी गर्दी केली. त्यानंतर पोलिसांना याची माहिती देण्यात आली.
वसई-विरार महापालिकेच्या अग्निशामक दलाला बोलवण्यात आले. पथकाने पाण्यात शोध घेत काही तासानंतर फुझेलचा मृतदेह बाहेर काढला. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली होती.