Thane: सराईत सोनसाखळी चोरट्यास ठाण्यात अटक; अडीच लाखांचे दागिने हस्तगत!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2025 22:11 IST2025-10-12T22:09:40+5:302025-10-12T22:11:26+5:30
सोनसाखळी चोरणाऱ्या आकाश तारक साहू या सराईत चोरट्याला अटक केल्याची माहिती श्रीनगर पोलिसांनी रविवारी दिली.

Thane: सराईत सोनसाखळी चोरट्यास ठाण्यात अटक; अडीच लाखांचे दागिने हस्तगत!
सोनसाखळी चोरणाऱ्या आकाश तारक साहू या सराईत चोरट्याला अटक केल्याची माहिती श्रीनगर पोलिसांनी रविवारी दिली. त्याच्याकडून सोनसाखळी चोरीचे दोन गुन्हे उघड झाले आहेत. सुमारे अडीच लाखांचे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे.
ठाण्यातील वागळे इस्टेट, श्रीनगर भागात ४ जुलै २०२५ रोजी सायंकाळी ६:०० वाजता अय्यप्पा मंदिराच्या पायऱ्यांवरून जात असलेल्या ५४ वर्षीय महिलेचे चोरट्याने जबरीने १० ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र हिसकावून नेले होते. याप्रकरणी श्रीनगर पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल झाला होता. वरिष्ठ पोलिस निरीक्षक गुलजारीलाल फडतरे यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलिस निरीक्षक शिवराज बेंद्रे यांचे पथक चोरीचा तपास करीत होते.
तपासावेळी मिळालेल्या माहितीच्या आधारे संशयित आरोपी आकाश या रेकॉर्डवरील गुन्हेगाराची माहिती पथकाला मिळाली. त्याआधारे केलेल्या चौकशीत त्याच्याकडून चोरीतील सोन्याचे मंगळसूत्र हस्तगत केले. त्याचाच श्रीनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील अन्य एका वृद्धेच्या सोनसाखळी जबरी चोरीच्या गुन्ह्यात सहभाग असल्याचेही उघड झाले. त्यानंतर त्याला ८ ऑक्टोबर रोजी अटक केली. या दोन्ही गुन्ह्यांमधील २० ग्रॅम वजनाचे २ लाख ५० हजारांचे सोन्याचे दागिने त्याच्याकडून जप्त केले आहेत. ही कारवाई बेंद्रे यांच्यासह उपनिरीक्षक संजय यादव, हवालदार तानाजी खोत, अंमलदार रंजीत माने आणि मनोहर गावित आदींच्या पथकाने केली.