धक्कादायक! ठाण्यात रेल्वे प्लॅटफॉर्मवर महिलेवर बलात्काराचा प्रयत्न, विरोध करताच मालगाडीसमोर ढकललं
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2025 13:32 IST2025-07-19T13:30:25+5:302025-07-19T13:32:46+5:30
Diva Railway Station: ठाण्यातील दिवा रेल्वे स्थानकावर महिलेवर जबरदस्ती करण्याच प्रयत्न झाला. परंतु, महिलेने विरोध करताच तिला मालगाडीसमोर ढकलण्यात आले.

धक्कादायक! ठाण्यात रेल्वे प्लॅटफॉर्मवर महिलेवर बलात्काराचा प्रयत्न, विरोध करताच मालगाडीसमोर ढकललं
ठाण्यातील दिवारेल्वे स्थानकावर शुक्रवारी पहाटे एका महिलेवर बलात्कार करण्याचा प्रयत्न करण्यात आला. परंतु, महिलेने विरोध करताच तिला धावत्या मालगाडीसमोर ढकलण्यात आले. याप्रकरणी ठाणेरेल्वे पोलिसांनी आरोपीला अटक करून न्यायालयात हजर केले असता पुढील चौकशीसाठी त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. मृत महिलेची अद्याप ओळख पटलेले नाही. याप्रकरणी रेल्वे पोलीस अधिक तपास करीत आहेत.
राजन सिंग (वय, ३९) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सकाळी पाच ते साडेपाच वाजताच्या सुमारास दिवा रेल्वे स्थानकावर रेल्वे सफाई कर्मचारी तुलसीदास हेमा कामदी (वय, ३५) काम करत असताना त्यांना ५/६ क्रमांकाच्या प्लॅटफॉर्मवरून मोठा आवाज ऐकू आला. तुलसीदासने आपल्या एका सहकाऱ्याला याची माहिती दिली. या दोघांनी जवळ जाऊन पाहिले असता त्यांना संबंधित आरोपी एका महिलेशी वाद घातलाना दिसला.
याप्रकरणी रेल्वे पोलिसांनी घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता त्यांना राजन प्लॅटफॉर्म मृत महिलेचा पाठलाग करताना आणि तिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करताना दिसला. परंतु, मृत महिलेने विरोध करते. मात्र, त्यामुळे आरोपीला राग अनावर होतो आणि तो महिलेला धावत्या मालगाडीसमोर ढकलून देतो. फ्री प्रेस जर्नलने याबाबत वृत्त दिले.
घटनेनंतर राजन रेल्वे ट्रॅकवरून चालत असताना दिवा रेल्वे स्थानकावर कर्तव्यावर असलेले पोलीस कॉन्स्टेबल सागर शिंदे यांनी पकडून ताब्यात घेतले. ठाणे रेल्वे पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या संबंधित कलमांखाली राजन सिंगविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला. आरोपीला अटक करून न्यायालयात हजर केले त्याला २२ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलिसांनी माहिती दिली आहे की, आरोपी आणि मृत महिला एकमेकांना ओळखत नव्हते. ही महिला कोण आहे, कुठे राहते? हे अद्याप समजू शकलेले नाही. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.