ठाणे: 'पार्टीत चूक झाल्यास अप्पा मुलांना द्यायचा विजेचा शॉक'; खडवली बालआश्रमातून सुटका केलेल्या मुलांनी सांगितली आपबीती
By सदानंद नाईक | Updated: April 19, 2025 05:58 IST2025-04-19T05:55:13+5:302025-04-19T05:58:55+5:30
Thane Crime news: आश्रमातील बहुतांश मुले भाऊ-बहीण व जवळच्या नात्यातील असल्याचे समितीच्या चौकशीत उघड झाले.

ठाणे: 'पार्टीत चूक झाल्यास अप्पा मुलांना द्यायचा विजेचा शॉक'; खडवली बालआश्रमातून सुटका केलेल्या मुलांनी सांगितली आपबीती
-सदानंद नाईक, उल्हासनगर
खडवलीच्या बालआश्रमच्या खिडकीतून दिसणारा सूर्यगोल मावळला की, आश्रमचा संचालक बबन शिंदे उर्फ अप्पा याची पार्टी सुरू व्हायची. आश्रमातील मुला-मुलींना अप्पाची सरबराई करायला लागायची. जर कुणी त्यामध्ये कमी पडले, कुरकुर केली, तर मारहाण हे नैमित्तिक होतेच; पण पोटात मद्य गेल्यावर अप्पा मुलांना विजेचा शॉकसुद्धा द्यायचा, अशी कबुली सुटका झालेल्या मुला-मुलींनी बालकल्याण समितीला दिली.
अप्पा दारू पिऊन कसा धिंगाणा घालायचा, याची माहिती बाहेर आली.
आश्रमातील बहुतांश मुले भाऊ-बहीण व जवळच्या नात्यातील असल्याचे समितीच्या चौकशीत उघड झाले. खडवलीतील अनधिकृतपणे चालविण्यात येणाऱ्या बालआश्रमातून २९ मुलांची जिल्हा बालकल्याण समितीने चाइल्ड हेल्पलाइन नंबरवरील तक्रारीनंतर सुटका केली.
गुन्हा दाखल झालेल्या आश्रमच्या संचालकासह पाच जण न्यायालयीन कोठडीत आहेत. आश्रमातील कर्मचारी चाकूचा धाक दाखवत असल्याचे व एका मुलाला चाकूचे व्रणही आढळले आहेत.
दादर रेल्वे स्टेशन परिसरात भंगार वेचण्याचे काम करणाऱ्या एका कुटुंबात सहा मुले होती. घरात दारिद्र्य. वडील नशेखोर आहेत. मोठ्या मुलीचा मृत्यू झाला. मोठा मुलगा मिळेल ते काम करतो. या कुटुंबातील दोन मुली व दोन मुले या आश्रमात होती.
त्या मुलांच्या तोंडून आश्रमातील अत्याचारांची कहाणी ऐकल्यावर हा आश्रम म्हणजे नरक होता, असेच वाटते. अप्पा व आश्रमाचे अन्य संचालक, केअरटेकर यांच्या दारूच्या पार्ट्यांच्या कहाण्या भेदरलेल्या मुलांनी सांगितल्या.
संचालकाची बनवाबनवी
साडेतीन ते बारा वर्षे वयाची ही मुले रात्री उशिरापर्यंत पार्टीत सरबराई करायची. चूक झाली, तर विजेचा शॉकसुद्धा दिला जात होता. मुला-मुलींच्या अंगावर मारल्याच्या जखमा, शॉक दिल्याचे डाग आहेत.
शिक्षण, खाण्यापिण्याचे आमिष आई-वडिलांना दाखवून मुलांना आश्रमात आणले होते. सर्वांचा पत्ता रेल्वे स्टेशन दाखवण्याची बनवाबनवी आश्रम संचालकांनी केली. आश्रमाचे संचालक आश्रमातील एका खोलीत राहतात. आश्रमातील २० पैकी चार मुलींवर अत्याचार झाला.
मुलांची विक्री ?
पसायदान विकास संस्थेच्या बालआश्रमात यापूर्वी राहणारी १६ वर्षांची मुलगी रेल्वे स्टेशनवर एका समाजसेविकेला भेटली. त्या महिलेने मुलीला गुरुवारी उल्हासनगर बाल कल्याण समितीच्या ताब्यात दिले.
मुलीचा जबाब नोंदवून निरीक्षणगृहात ठेवण्याचे आदेश दिले. तिने आश्रमातील काही मुलांची विक्री झाल्याचा संशय व्यक्त केल्याचे सूत्रांनी दिली.