परिवहनच्या प्रस्तावांना स्थगिती

By Admin | Updated: October 12, 2016 04:16 IST2016-10-12T04:16:09+5:302016-10-12T04:16:09+5:30

कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या परिवहन सेवेच्या बस आगारांचा कायापालट करण्यासंदर्भात सोमवारी स्थायी समितीच्या सभेत दाखल झालेल्या प्रस्तावांना स्थगिती

Suspension of Transportation Proposals | परिवहनच्या प्रस्तावांना स्थगिती

परिवहनच्या प्रस्तावांना स्थगिती

कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या परिवहन सेवेच्या बस आगारांचा कायापालट करण्यासंदर्भात सोमवारी स्थायी समितीच्या सभेत दाखल झालेल्या प्रस्तावांना स्थगिती देण्यात आली. आयुक्त ई. रवींद्रन यांच्याशी चर्चा करूनच पुढील निर्णय घेतला जाईल, अशी भूमिका सभापती संदीप गायकर यांनी यावेळी स्पष्ट केली.
आगाराच्या व्यवस्थेकडे पुरते दुर्लक्ष झाल्याने दलदलीची आगारे आणि मोडकळीस आलेली कार्यालये हे चित्र केडीएमटीच्या तिन्ही आगारांमध्ये पाहायला मिळते. वसंत व्हॅली आगाराचा भूखंड विकसित करणे, खंबाळपाडा आगारात अंतर्गत सुधारणा करणे याचबरोबर गणेशघाट आगारात लाद्या बसवणे, गटारासाठी व बस थांबण्यासाठी स्टॉपरची व्यवस्था करणे, फर्निचरसह डांबरीकरण करणे आदी कामांचे साडेचार कोटींचे प्रस्ताव मान्यतेसाठी सोमवारच्या स्थायी समितीच्या सभेत दाखल करण्यात आले होते. परंतु, प्रस्ताव चर्चेला येताच, ज्या कंत्राटदाराला वसंत व्हॅली आगारातील डांबरीकरणाचे काम दिले आहे, त्याने इतरत्र खड्डे भरण्याची कामे योग्य प्रकारे केलेली नाहीत, असा मुद्दा सदस्य रमाकांत पाटील आणि प्रेमा म्हात्रे यांनी उपस्थित केला. गणेशोत्सवात केलेली कामे निकृष्ट झाल्याने पुन्हा रस्त्यांवर खड्डे पडल्याकडे यावेळी लक्ष वेधण्यात आले. प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी या कामांची पाहणी करावी व त्यानंतरच त्यांना बिले अदा करावीत, अशी सूचना सदस्यांनी केली. परिवहनच्या कामांच्या निविदा या कमी दराने आल्याचा मुद्दा ही यावेळी मांडण्यात आला. यावर संबंधित निविदाप्रकरणी सुरक्षा अनामत घेण्यात येते तसेच यावेळी पावसाचे प्रमाण जास्त होते, त्यामुळे खड्डे पडल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले. कोणत्याही कंत्राटदाराला कामांची बिले अदा केलेली नाही, असेही यावेळी सांगण्यात आले.
दरम्यान, निकृष्ट कामे करणाऱ्या कंत्राटदाराला काळ््या यादीत टाकण्याचा सूचना करत आयुक्तांच्या चर्चेनंतरच प्रस्तावांबाबत निर्णय होईल, असे गायकर यांनी स्पष्ट केले.

Web Title: Suspension of Transportation Proposals