हातभट्टी दारू धंद्यावर कारवाई करू नये म्हणून उल्हासनगरात राज्य उत्पादन शुल्क कर्मचाऱ्याला मारहाण
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2025 19:39 IST2025-07-09T19:38:45+5:302025-07-09T19:39:28+5:30
याप्रकरणी हिललाईन पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल झाला असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.

हातभट्टी दारू धंद्यावर कारवाई करू नये म्हणून उल्हासनगरात राज्य उत्पादन शुल्क कर्मचाऱ्याला मारहाण
उल्हासनगर : शहरातील हातभट्टी गावठी दारुच्या अवैध धंद्यावर कारवाई करण्यासाठी गेलेल्या राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कर्मचाऱ्याला शिवीगाळ, धक्काबुक्की व मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार मंगळवारी दुपारी घडला. याप्रकरणी हिललाईन पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल झाला असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.
उल्हासनगर राज्य उत्पादन शुल्क विभागाला शहर शेजारील वसारगाव येथे हातभट्टी गावठी दारूचा अड्डा सुरु असल्याची माहिती मिळाली होती. विभागाच्या पथकाने मंगळवारी दुपारी ऐक वाजता गावठी दारू अड्ड्यावर धाड टाकून कारवाई सुरु केली. यावेळी अविनाश वायले याने गावठी दारू अड्ड्यावर कारवाई करू नये म्हणून विभागाचे कर्मचारी शरद यशवंत भोर यांना शिवीगाळ करीत धक्काबुक्की केली. तसेच कारवाई केलीतर मारण्याची धमकी दिली. अखेर विभागाचे कर्मचारी भोर यांच्या तक्रारीवरून सरकारी कामात अडथळा आणणे, शिवीगाळ व धक्काबुक्की करणे, मारण्याची धमकी देणे आदी कलम अंतर्गत हिललाईन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. अधिक तपास पोलीस करीत आहेत.
शहरांतील बहुतांश झोपडपट्टी मध्ये हातभट्टी व गावठी दारूचे अड्डे आहेत. तसेच शहरातील बार व हॉटेल मध्ये बनावट दारूची विक्री सर्रासपणे होत असल्याची टिका होत आहे. यावर कारवाई करण्याची मागणी राज्य उत्पादन शुल्क विभागाला सामाजिक संघटना, शहरवासिय व राजकीय नेत्याकडून केली जात आहे. मात्र विभागाकडून कोणतीच कारवाई होत नसल्याने, त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.