मीरा भाईंदर मधील ५०० फुटांच्या घरांना मालमत्ता कर माफी ठरले एप्रिल फुल

By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2022 09:54 PM2022-03-31T21:54:14+5:302022-03-31T21:54:20+5:30

मुंबई महापालिकेने ५०० फुटांच्या घरांना मालमत्ता कर माफ केला आहे. तसाच करमाफीचा निर्णय ठाणे व नवी मुंबई महापालिकेने घेतला आहे.

Property tax exemption for 500 feet houses in Mira Bhayandar April Fool's Day | मीरा भाईंदर मधील ५०० फुटांच्या घरांना मालमत्ता कर माफी ठरले एप्रिल फुल

मीरा भाईंदर मधील ५०० फुटांच्या घरांना मालमत्ता कर माफी ठरले एप्रिल फुल

Next

धीरज परब / मीरारोड - मीरा भाईंदर मधील नागरिकांच्या ५०० चौ . फुटां पर्यंतच्या घरांना मालमता कर माफी म्हणजे निव्वळ एप्रिल फुल ठरणार आहे . कारण नागरिकांना कर माफी देण्यास प्रशासनाने नकार दिला असतानाच दुसरीकडे सत्ताधाऱ्यांनी शासना कडून अनुदान मिळाले तरच कर माफ करण्याचे ३० मार्चच्या महासभेत स्पष्ट केले आहे . त्यामुळे मुंबई प्रमाणे मीरा भाईंदर मधील घरांना करमाफी मिळणार नसल्याचे जवळपास स्पष्ट झाले आहे. 

मुंबई महापालिकेने ५०० फुटांच्या घरांना मालमत्ता कर माफ केला आहे . तसाच करमाफीचा निर्णय ठाणे व नवी मुंबई महापालिकेने घेतला आहे. आमदार प्रताप सरनाईक व गीता जैन सह विरोधी पक्ष नेते धनेश पाटील आदींनी करमाफीची मागणी  केल्या नंतर  महापौर ज्योत्सना हसनाळे  यांनी महासभेत विषय घेतला होता . परंतु सत्ताधारी भाजपने ५०० फुटांच्या घरांना मालमत्ता कर माफ करण्याचा ठराव महासभेत बहुमताने मंजूर करताना शासन कडून अनुदान मागितले होते . 

वास्तविक मुंबई, ठाणे , नवी मुंबई ह्या महापालिकांनी कर माफीसाठी शासना कडून अनुदान मागितलेले नसताना मीरा भाईंदर पालिकेला शासन अनुदान देईल ह्याची शक्यता नाही याची कल्पना सत्ताधारी व विरोधकांसह प्रशासनाला सुद्धा असावी. भाजपा कडून, सेनेच्या आमदारांनी शासना कडून करमाफीसाठी अनुदान आणावे अशी भूमिका घेत सेने आणि शासनावर करमाफीचा चेंडू टोलवला . तर महापालिकेत सत्ता भाजपाची असून करोडोंची उधळपट्टी आणि बड्या थकबाकीदार , ठेकेदार आदीं कडील थकबाकी वसूल न करणाऱ्या भाजपाने नागरिकांना कर माफी देण्याची पालिकेची जबाबदारी झटकल्याची टीका शिवसेनेने केली होती . मुंबई , ठाणे , नवी मुंबई पालिकांनी शासना कडे अनुदान मागितले नाही कारण ती पालिकेची जबाबदारी असल्याचे सेनेने म्हटले होते . 

 

दरम्यान पालिका आयुक्त दिलीप ढोले यांनी पालिकेचे १०९ कोटींचे नुकसान होणार असल्याने खर्च भागवणे अवघड होईल व करमाफी देणे उचित नाही असे स्पष्ट करत करमाफीला खीळ लावली .  त्यातच भाजपाने पालिकेच्या अर्थसंकल्पात देखील मालमत्ता करमाफीसाठी शासना कडून ११० कोटींचे अनुदान मिळेल असे नमूद केले आहे . त्यामुळे मीरा भाईंदर मध्ये ५०० फुटां पर्यंतच्या घरांना करमाफी मिळणे निव्वळ एप्रिल फुल ठरणार आहे. या आधी कोरोना काळात प्रामाणिकपणे कर भरणाऱ्या नागरिकांना ५० टक्के करमाफी सुद्धा पालिकेने दिली नाही . परंतु दुसरीकडे बड्या थकबाकीदारांना मात्र तब्बल ७५ टक्के व्याज माफी देण्यात आली . 

राकेश शाह ( सभापती स्थायी समिती ) - महासभेतील  ठराव नुसार अर्थसंकल्पात शासन कडून ११० कोटींचे अनुदान मिळेल असे नमूद केले आहे . शहरातील शिवसेनेच्या दोन आमदारांनी शासना कडून अनुदान आणल्या नंतर नागरिकांना मालमत्ता कर माफी दिली जाईल. धनेश पाटील ( विरोधीपक्ष नेते ) - मीरा भाईंदरच्या नागरिकांना करमाफी देण्याची भाजपाची नियत व दानत नाही . २२५० कोटींचा अर्थसंकल्प बनवणाऱ्या भाजपाला नागरिकांसाठी १०० कोटींची करमाफी द्यायची नाही. कारण त्यांना मनमानी ठेके देणे व उधळपट्टी करण्यात स्वारस्य आहे . या आधी कोरोना काळात सुद्धा नागरिकांना ५० टक्के करमाफी भाजपाने दिली नाही . 

 

Web Title: Property tax exemption for 500 feet houses in Mira Bhayandar April Fool's Day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.