पूर्वसूचना न देता वीजपुरवठा खंडित, नागरिकांच्या तक्रारीनंतर मनसेची टोरंट कंपनीवर धडक
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2020 00:04 IST2020-12-04T00:04:14+5:302020-12-04T00:04:42+5:30
लॉकडाऊनमध्ये लोकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. काहींना ५० टक्के पगार आहे. मुलांचे ऑनलाइन शिक्षण, तर नोकरदारांचे वर्क फ्रॉम होम सुरू आहे.

पूर्वसूचना न देता वीजपुरवठा खंडित, नागरिकांच्या तक्रारीनंतर मनसेची टोरंट कंपनीवर धडक
ठाणे : पूर्वसूचना न देता कळवावासीयांची वीज कापल्याने गुरुवारी मनसेने टोरंट वीज कंपनीवर धडक दिली. याबाबत नागरिकांनी तक्रारी केल्यानंतर मनसेने वीज कंपनीला जाब विचारला. पुन्हा कळवावासीयांची वीज कापल्यास टोरंट वीज कंपनीचे कार्यालय फोडण्याचा इशारा मनसेने यावेळी दिला.
लॉकडाऊनमध्ये लोकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. काहींना ५० टक्के पगार आहे. मुलांचे ऑनलाइन शिक्षण, तर नोकरदारांचे वर्क फ्रॉम होम सुरू आहे. अशातच टोरंट वीज कंपनीने वीजबिल न भरल्याचे कारण देत कळवा येथील नागरिकांची वीज कापल्याच्या तक्रारी मनसेचे उपशहराध्यक्ष सुशांत सूर्यराव यांच्याकडे बुधवारपासून येत होत्या. या तक्रारींवरून सूर्यराव यांच्यासह मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी टोरंट वीज कंपनीवर धडक देऊन जाब विचारला. कळवा येथील रहिवासी प्रशांत चित्ते म्हणाले की, २३ जुलैला टोरंट वीज कंपनीने काहीही सूचना न देता तसेच आमची परवानगी न घेता मीटर बदलले. तेव्हापासून आतापर्यंतचे बिल ३८ हजार रुपये आले आहे. त्यातील आठ हजार रुपये भरले आहेत. परंतु, पूर्वसूचना न देता बुधवारी आमची वीज कापली. वारंवार वीजबिल घेऊन कंपनीकडे आम्ही जात असतो, पण कंपनीचे कर्मचारी सहकार्य करीत नसल्याचे चित्ते म्हणाले.
मराठी भाषेत सूचना द्या
राज्य शासनाचे आदेश असतानाही टोरंट कंपनीचे संकेतस्थळ, ॲप व सूचना या इंग्रजी भाषेत असतात. हे सर्व मराठी भाषेत असावे, याबाबतचे निवेदन चार वेळा कंपनीला दिले. अद्याप त्यांनी काहीही केले नाही. सात दिवसांत टोरंट कंपनीचे दैनंदिन व्यवहार मराठीत न झाल्यास मनसे स्टाइलने दणका दिला जाईल, असा इशारा सूर्यराव यांनी दिला.
पूर्वसूचना देऊनच ग्राहकांची वीज कापण्यात आली आहे. संकेतस्थळ, ॲप मराठी भाषेत करण्याची प्रक्रिया सुरू आहे.- प्रदीप, वाकणकर, अधिकारी, टोरंट वीज कंपनी