पोलीस असल्याचे सांगून पैसे उकळणाऱ्या दोघांना अटक; दुचाकीसह रोकड जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2022 21:27 IST2022-05-20T21:26:09+5:302022-05-20T21:27:31+5:30
पोलीस असल्याचे सांगून, बळजबरी पैसे उकळणाऱ्या दोघांना भाईंदरच्या नवघर पोलिसांनी बदलापूर येथून अटक केली आहे.

पोलीस असल्याचे सांगून पैसे उकळणाऱ्या दोघांना अटक; दुचाकीसह रोकड जप्त
मीरारोड - एक किराणा दुकानदार माल घेऊन जात असताना त्याला अडवून आणि पोलीस असल्याचे सांगून, बळजबरी पैसे उकळणाऱ्या दोघांना भाईंदरच्या नवघर पोलिसांनीबदलापूर येथून अटक केली आहे. भाईंदरमध्ये विनोद मौर्या यांचे किराणा दुकान आहे.
मोर्या इंद्रलोक नाका येथील पानटपरीवर मालाची डिलेव्हरी करीत असतांना तेथे दोन अनोळखी इसम आले. आम्ही पोलीस आहोत, तू गुटखा विक्री करतोस, असे सांगत मौर्या यांना रिक्षात बसवून गोल्डन नेस्ट सर्कल येथे घेऊन गेले. तेथे त्यांच्याकडे असलेले १८ हजार रुपये जबरदस्तीने काढून घेतले. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता.
तपासात आरोपी हा सिध्दार्थ रामदास जोहरे असल्याचे निष्पन्न होऊन तांत्रीक माहितीच्या आधारे तपास करत जोहरे व साथीदार अब्दुल अहमद खान ह्या दोघांना बदलापूरमधून अटक करण्यात आली आहे. गुन्ह्यात वापरलेली दुचाकी व ८ हजार रोख जप्त केली आहे. रक्कम हस्तगत करून गुन्हा उघडकीस आणला आहे. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रकाश मासाळ व पथकाने ही कारवाई केली.