पीएनबी आर्थिक घोटाळा: मेहूल चोक्सीच्या ठाण्यातील मालमत्तेचे ‘ईडी’कडून मूल्यांकन सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2018 21:54 IST2018-02-19T21:25:34+5:302018-02-19T21:54:42+5:30
मेहूल चोक्सीच्या ‘गीतांजली’ ज्वेलर्सच्या ठाण्यातील एका मॉलमधील ‘जिली’च्या दोन दुकानांमधील दागिन्यांचे मूल्यांकन सोमवारी दिवसभर सुरू होते. सुमारे आठ ते १० कोटींची मालमत्ता असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

पीएनबी आर्थिक घोटाळा
ठाणे : पंजाब नॅशनल बँकेत ११ हजार ४०० कोटींचा आर्थिक घोटाळा करून पसार झालेल्या नीरव मोदीचा भागीदार तथा त्याचा मामा मेहूल चोक्सी याच्या मालकीच्या ‘गीतांजली’ ज्वेलर्सच्या ठाण्यातील एका मॉलमधील ‘जिली’च्या दोन दुकानांमधील दागिन्यांचे मूल्यांकन सोमवारी दिवसभर सुरू होते. अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) अधिका-यांसह पंजाब नॅशनल बँकेतील अधिका-यांच्या उपस्थितीमध्ये मूल्यांकनाचे हे काम सुरू होते. या दोन्ही दुकानांमध्ये सुमारे आठ ते १० कोटींची मालमत्ता असल्याची माहिती सूत्रांनी दिली.‘पीएनबी’ बँकेतील आर्थिक घोटाळ्याप्रकरणी ठाण्याच्या ‘विवियाना’ मॉलमधील चोक्सी यांच्या मालकीच्या ‘जिली’ या हि-याच्या दागिन्यांच्या दुकानासह ‘शॉपर्स स्टॉप’ शोरूममधील ‘जिली’च्या काऊंटरवर ईडीच्या मुंबई विभागाचे सहायक संचालक अंजन चंदा यांच्या पथकाने १६ फेब्रुवारी रोजी छापा टाकून ही दोन्ही दुकाने सीलबंद केली. सोमवारी (१९ फेब्रुवारी रोजी) या दुकानांपैकी शॉपर्स स्टॉपमधील जिलीच्या काउंटर्समधील सर्व दागिन्यांचे मूल्यांकन करणारे तज्ज्ञ, धनंजय सिंग आणि नरेश घई या पंचांच्या आणि दुकानातील कर्मचा-यांच्या मदतीने सकाळी ११ ते दुपारी २ पर्यंत ही पडताळणी सुरू होती. याठिकाणी सुमारे तीन कोटींच्या आसपास हि-यांचे दागिने मिळाल्याची माहिती सूत्रांनी दिली. धाडीबाबतचा तपशील तसेच नेमके किती दागिने ताब्यात घेण्यात आले, याची कोणतीही माहिती देण्यास ईडीच्या अधिका-यांनी इन्कार केला. वेगवेगळ्या ३६ पॅकेट्समध्ये ते जप्त केल्याचे एका अधिकाºयाने सांगितले.
या पडताळणीनंतर याच मॉलमधील ‘गीतांजली’ ज्वेलर्सच्याच ‘जिली’च्या दुकानातही दुपारी ३ ते रात्री उशिरापर्यंत मूल्यांकनाचे काम सुरू होते. सायंकाळी ७ पर्यंत तीन कोटींच्या दागिन्यांची मोजणी पूर्ण झाली होती. त्यानंतरचा तपशील मात्र उपलब्ध होऊ शकला नाही. दोन्ही दुकानांमध्ये किमान आठ ते १० कोटींची मालमत्ता असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.
ईडीला संपूर्ण सहकार्य - शॉपर्स स्टॉप
गीतांजली समूहाकडून जिली, नक्षत्र, निर्वना अशा वेगवेगळ्या ब्रॅण्डचे दागिने शॉपर्स स्टॉप या काउंटर्सवरून विकले जातात. ईडीने ठाण्यातील गीतांजलीच्या शॉपर्स स्टॉपमधील गिलीच्या काउंटरवर छापा मारल्याने ते चर्चेत आले असले, तरी ईडीला आमचे संपूर्ण सहकार्य असून ग्राहकांसाठी याठिकाणची सर्व काउंटर्स नेहमीप्रमाणे सुरळीत सुरू असल्याची माहिती शॉपर्स स्टॉपच्या वतीने देण्यात आली.