ठाण्यातील नीरव मोदींशी संबंधीत सात कोटींच्या मालमत्तेवर ‘ईडी’ची टाच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2018 07:29 PM2018-02-16T19:29:21+5:302018-02-16T19:51:40+5:30

पंजाब नॅशनल बँकेतील हजारो कोटींच्या घोटाळयाशी संबंधित ठाण्यातील ‘जिली’ या हि-याच्या दागिन्यांच्या दुकानासह ‘शॉपर्स स्टॉप’ शोरुममधील ‘जिली’ च्या काऊंटरवर छापे मारून ते ईडीच्या पथकांनी सिलबंद केले.

 ED's heels on property worth Rs. 7 crores related to Neerav Modi in Thane! | ठाण्यातील नीरव मोदींशी संबंधीत सात कोटींच्या मालमत्तेवर ‘ईडी’ची टाच!

अंमलबजावणी संचालनालयासह पीएनबी बँकेच्या अधिका-यांचे धाडसत्र

Next
ठळक मुद्देअंमलबजावणी संचालनालयासह पीएनबी बँकेच्या अधिका-यांचे धाडसत्रगुरुवारी रात्री पाच तास सुरु होती कारवाईलवकरच होणार मालमत्तेचे मुल्यांकन

ठाणे : पंजाब नॅशनल बँकेत ११ हजार ४०० कोटींचा आर्थिक घोटाळा घडविल्याचा आरोप असलेल्या नीरव मोदींशी संबंधित ठाण्यातील एका मॉलमधील सात कोटींच्या मालमत्तेवर अंमलबजावणी संचालनालयाच्या अधिका-यांनी गुरुवारी रात्री कारवाई केली. यात ‘जिली’ या हि-याच्या दागिन्यांच्या दुकानासह ‘शॉपर्स स्टॉप’ शोरुममधील ‘जिली’ च्या काऊंटरवर छापे मारून ते रात्री उशिरा सिलबंद केले.
अमलबजावणी संचालनालयाच्या मुंबई विभागाचे सहायक संचालक अंजन चंदा यांच्यासह आठ जणांच्या पथकाने तसेच पंजाब नॅशनल बँकेच्या अधिका-यांनी गुरुवारी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास आधी विवियाना मॉलच्या तळमजल्यावरील ‘जिली’ या हि-याच्या दागिन्यांच्या ‘शॉपर्स स्टॉप’ मधील शोरुमच्या काऊंटरचा ताबा घेतला. या काऊंटरवरच काही प्रतिष्ठीत पंचांना पाचारण करून त्यांनी तिथे असलेल्या कर्मचा-यांकडून कागदपत्रांची आणि दागिन्यांची तपासणी सुरू केली. ती सुरू असतांनाच चंदा यांच्या दुस-या एका चार जणांच्या पथकाने ८.३० वाजण्याच्या सुमारास ‘जिली’ च्या मुख्य दुकानावरही धाड टाकली. अचानक सुरू झालेल्या या धाडसत्रामुळे सुरुवातीला या दुकानातील कर्मचारी पूर्णपणे गोंधळले होते. मालक नसल्यामुळे आमच्याकडे काहीच माहिती नसल्याचा दावा त्यांनी केला. परंतु, आम्ही ‘ईडी’ डिपार्र्टंमेट आणि पंजाब नॅशनल बँकेतून आलो आहोत, आम्हाला पूर्णपणे सहकार्य करा,’ असे आवाहन ओळखपत्र दाखवून या अधिका-यांनी केल्यानंतर याठिकाणीही काही पंचाना बोलावून प्रत्येक काउंटर आणि दागिन्यांची माहिती घेऊन त्याची नोंद करण्यात आली. गुरुवारी रात्री १२.३० वाजेपर्यत ही कारवाई सुरू होती. संपूर्ण दागिने, रोकड आणि कागदपत्रांची माहिती घेतल्यानंतर या दोन्ही दुकानांना रितसर सील करण्यात आले. यापुढे ही दुकाने पुढील कारवाई होईपर्यत उघडली जाणार नाहीत, असेही या अधिका-यांनी दोन्ही दुकानांतील कर्मचा-यांना बजावले. ‘गिली’ मध्ये चार कोटींची तर ‘शॉपर्स स्टॉप’ शोरुममधील ‘गिली’ च्या काऊंटरमध्ये तीन कोटींची मालमत्ता असल्याची प्राथमिक माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान, आता केवळ ही दुकाने सीलबंद करण्याची कारवाई झाली असून येत्या तीन ते चार दिवसांमध्ये दोन्ही दुकानातील ऐवजाच्या मुल्यांकनाचे काम केले जाणार असल्याची माहिती ईडीच्या अधिका-यांनी ‘लोकमत’ला दिली.

Web Title:  ED's heels on property worth Rs. 7 crores related to Neerav Modi in Thane!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.