Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2025 18:52 IST2025-08-13T18:50:42+5:302025-08-13T18:52:28+5:30
Palghar Crime News: पालघर शहरात एक खळबळजनक घटना घडली. एका तरुणावर धक्का लागल्याच्या कारणावरून वाद घातला. त्यानंतर थेट कुऱ्हाडीने डोक्यावरच वार केले. आरोपी निघून जात असताना लोकांनी त्याला पकडले आणि झाडाला बांधून चोप दिला.

Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
Palghar Latest News: पालघर शहरातील कमला पार्क येथील लोकांची वर्दळ असलेल्या चौकातच भयंकर घटना घडली. एका २८ वर्षीय तरुणाने ३५ वर्षीय तरुणावर शुल्लक वादातून कुऱ्हाडीने हल्ला केला. यात ३५ वर्षीय तरुण गंभीर जखमी झाला. या प्रकारानंतर घटनास्थळी जमलेल्या लोकांनी आरोपीला पकडले. त्याला झाडाला बांधून मारहाण केली. घटनेची माहिती मिळताच पोलीस धाव घेतली आणि त्याला ताब्यात घेतले.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
अमरजीत कुमार संतोष राम (वय २८ ) असे आरोपीचे नाव आहे. त्याने बाबूलाल फुलचंद यादव यांच्यावर कुऱ्हाडीनेच हल्ला केला.
कुऱ्हाडीने हल्ला, पण नेमकं काय घडलं?
पालघर नगर परिषद क्षेत्रातील पालघर-माहीम रोडवरील कमला पार्क या वसाहती जवळ असलेल्या चौकात बुधवारी (१३ ऑगस्ट) दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.
आरोपी अमरजीत कुमार संतोष राम आणि बाबूलाल फुलचंद यादव यांच्यात शुल्लक कारणावरून धक्काबुक्की झाली. त्यानंतर धक्काबुक्कीचे पर्यावसन हाणामारीत झाले.
आरोपी अमरजीत कुमार याने जवळच पडलेल्या कुऱ्हाडी घेतली आणि बाबुलालवर जीवघेणा हल्ला केला. बाबुलालच्या चेहऱ्यावर कुऱ्हाडीने जोरदार घाव घातल्याने तो गंभीर जखमी झाला. जखमी अवस्थेत बाबूलालला तात्काळ ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले.
...अन् लोकांनी आरोपीला पकडले
आरोपी हल्ला केल्यानंतर पळून जात होता. लोकांना हे दिसले. स्थानिक नागरिकांनी पाठलाग करून आरोपीला पकडले. त्यानंतर आरोपीला झाडाला बांधले आणि चांगलाच चोप दिला.
दरम्यान, पालघर पोलिसांना या घटनेबद्दल कळले. पोलिसांनी ताबडतोब घटनास्थळी पोहोचून त्या हल्लेखोराला ताब्यात घेतले असून, त्याच्या विरोधात घातक शस्त्राने गंभीर दुखापत करणे (बी एन एस 326) या कलमान्वये पालघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपीला पालघर न्यायालयात हजर करण्याची प्रक्रिया पोलीस ठाण्यात सुरू असल्याचे पालघर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनंत पराड यांनी सांगितले.