कैद्यांना मोकाट सोडणारे ठाण्याचे नऊ पोलिस निलंबित
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2025 07:09 IST2025-08-10T07:09:07+5:302025-08-10T07:09:37+5:30
अचानक केलेल्या तपासणीत धक्कादायक प्रकार आला उघडकीस

कैद्यांना मोकाट सोडणारे ठाण्याचे नऊ पोलिस निलंबित
ठाणे :ठाणे कारागृहातील सात कैद्यांना वैद्यकीय तपासणीसाठी ठाणे महापालिकेच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात नेले होते. त्याठिकाणी ठाणे शहर मुख्यालयाचे पोलिस उपायुक्त डॉ. पवन बनसोड यांनी केलेल्या अचानक झाडाझडती घेतली असता दोन कैदी गैहजर असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली होती. या हलगर्जीकरिता मुख्यालयातील पोलिस हवालदार गंगाराम घुले यांच्यासह नऊ पोलिसांवर उपायुक्त बनसोड यांनी निलंबनाची कारवाई केली. कैद्यांकडून मलिदा घेऊन त्यांना कुटुंबासमवेत किंवा गँगच्या सदस्यांसोबत मौजमजा करण्याकरिता सोडल्याचा संशय व्यक्त होत आहे.
कळवा येथील ठाणे महापालिकेच्या रुग्णालयात ठाणे जिल्हा मध्यवर्ती कारागृहातील सात कैद्यांना तपासणीसाठी ४ ऑगस्ट २०२५ रोजी नेले होते. उपायुक्त बनसोड यांनी अचानक या रुग्णालयात कैद्यांची तसेच बंदोबस्तावरील पोलिस अंमलदारांची झाडाझडती घेण्यात आली. तपासणीमध्ये सात पैकी केवळ पाच कैदी आढळले. उर्वरित दोघे हे एक्स रे तपासणीसाठी किंवा लघुशंकेसाठी शौचालयात गेल्याची धादांत खोटी उत्तरे बंदोबस्तावरील पोलिसांनी दिली. दोन्ही ठिकाणी हे कैदी आढळले नाही. चौकशीदरम्यान सातही कैद्यांना ठाणे जिल्हा मध्यवर्ती कारागृहात याच अंमलदारांनी शासकीय वाहनातून सोडल्याचे उघडकीस आले. कैदी पार्टीच्या बंदोबस्तामध्ये हलगर्जी, बेजबाबदारपणा केल्याचा ठपका ठेवत घुले यांच्यासह नऊ जणांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
काय आहेत आरोप?
पोलिस उपायुक्तांच्या झाडाझडीत केवळ पाच न्यायालयीन कैदी आढळले.
पाचपैकी एकाला बेडी न लावता बाहेर बसून ठेवले होते.
कैद्यांच्या अनुपस्थितीबाबत प्रभारी घुले यांनी उलटसुलट उत्तरे दिली.
दोन्ही कैदी क्ष-किरण तपासणी किंवा शौचालयातही नव्हते.
५ कैद्यांना कारागृहात परत सोडण्याचे आदेश दिल्यानंतर सातही कैदी हे एकत्रित ३:५० च्या सुमारास कारागृहात सोडल्याचे आढळले.
मौजमजेसाठी हेतूपुरस्सर हातमिळवणी करून वरिष्ठांची दिशाभूल केली.