येऊरमध्ये माझा कचरा, माझी जबाबदारी मोहीम
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2021 14:31 IST2021-06-09T14:27:31+5:302021-06-09T14:31:03+5:30
कचरा टाकून निसर्ग प्रदूषित न करण्याचे आवाहन, आतापर्यंत उचलला तीन ट्रक कचरा.

येऊरमध्ये माझा कचरा, माझी जबाबदारी मोहीम
ठाणे : शहरालगत असलेल्या येऊरच्या डोंगराळ भागात जैवविविधता व पश्चिम घाटातील अनेक वनस्पती या ठिकाणी आपल्याला पहावयास मिळतात. परंतु अलीकडच्या काळात येऊरचा परिसर, येथील निसर्ग हा मानवी चुकांमुळे दूषित होत चालला आहे. प्रदूषणापासून येऊरला वाचविण्यासाठी एकलव्य क्रीडा मंडळ आणि येऊर संवर्धन समिती यांनी माझा कचरा, माझी जबाबदारी ही मोहीम सुरू केली आहे. मार्च महिन्यापासून सुरू झालेल्या या मोहीमअंतर्गत आतापर्यंत तीन ट्रक कचरा उचलेला आहे. येऊर हा संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील एक भाग आहे आणि येऊरचा निसर्ग ही ठाण्याची ओळख आहे.
परंतु योग्य ती काळजी घेतली तर हा सुंदर निसर्गसौंदर्य आपण आपल्या पुढच्या पिढीला दाखवू शकू. अन्यथा हा निसर्ग लोप पावत जाईल. गेल्या काही वर्षांत या ठिकाणी वाढत असलेले बंगले, हॉटेल यांमुळे कचरा देखील वाढू लागला आहे आणि तो कचरा ओढ्यात फेकून थेट जंगलात जाऊन त्यामुळे पर्यावरणाला हानी पोहीचत असल्याचे येऊरचे रहिवाशी आणि एकलव्य क्रीडा मंडळ आणि येऊर संवर्धन समितीचे संस्थापक अध्यक्ष किशोर म्हात्रे यांनी सांगितले. म्हात्रे यांनी स्वतः पुढाकार घेऊन मार्च महिन्यापासून त्यांचे सहकारी शिक्षक आणि खेळाडूंच्या मदतीने कचरा उचलण्याची मोहीम हाती घेतली.
मे महिन्यापर्यंत ते शनिवारी आणि रविवारी ही मोहीम राबवित परंतू पावसाचे दिवस सुरू झाल्याने या मोहिमेला गती यावी म्हणून रोज सकाळी ते कचरा उचलून जंगल प्रदूषणमुक्त ठेवण्याचे काम करीत आहेत. येऊरमध्ये बंगल्यात येणारे लोक, तसेच येऊरला पार्टीला येणारे लोक बाटल्या, प्लास्टिक व इतर कचरा तसाच फेकून देतात. त्यामुळे दुपटीने कचरा वाढत आहे. या कचऱ्याची विल्हेवाट लागत नसल्याने तो तसाच पडून राहतो याने पर्यावरणाचा ऱ्हास होतो. त्यामुळे आपला कचरा ही आपलीच जबाबदारी असल्याची जनजागृती म्हात्रे आणि त्यांची संस्था करीत आहे. पालिका प्रशासनाला सांगून त्यांनी घंटागाडीची वारंवारता देखील वाढवली आहे.