गॅस सिलेंडर व पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे मोदी सरकार विरुद्ध आंदोलन
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2021 18:58 IST2021-07-03T18:53:54+5:302021-07-03T18:58:00+5:30
Gas Cylinder Price Hike : भाजपा सरकारने कोरोनाच्या आर्थिक संकटात सापडलेल्या सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देण्याऐवजी त्यांची लूटमार करून जगणे असह्य केले आहे.

गॅस सिलेंडर व पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे मोदी सरकार विरुद्ध आंदोलन
मीरारोड - अच्छे दिन आयेंगे असे खोटे सांगू उन लोकांची फसवणूक करणाऱ्या भाजपा आणि मोदी सरकारने सर्वसामान्य नागरिकांना महागाईच्या आगीत लोटले असल्याचा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेसने मीरा रोड येथे गॅस सिलेंडर व पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीविरोधात आंदोलन केले.
मीरा भाईंदर राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अंकुश मालुसरे, माजी महापौर निर्मला सावळे, माजी सभापती मोहन पाटील व आसिफ शेख, नरेंद्र भाटिया, लक्ष्मण पाटील, ममता मोराईस, एड. विक्रम तारे पाटील, माधुरी तांबे, साजिद पटेल, वनजाराणी नायडू, भारती त्रिवेदी, जकी पटेल, भरत डगली आदींसह कार्यकर्त्यांनी मीरा रोड रेल्वे स्थानकाबाहेरील शहीद मेजर कौस्तुभ राणे चौकाजवळ केंद्रातील भाजपच्या मोदी सरकार च्या निषेधार्थ निदर्शने केली.
यावेळी गटाराच्या पाण्याने गॅस सिलेंडर भरण्याचा मोदी मंत्र असे सादरीकरण करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची खिल्ली उडवली. तर महिलांनी चूल पेटवून भाकऱ्या थापत गॅस दरवाढीचा निषेध केला. यावेळी भाजपा व मोदी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली.
भाजपा सरकारने कोरोनाच्या आर्थिक संकटात सापडलेल्या सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देण्याऐवजी त्यांची लूटमार करून जगणे असह्य केले आहे. देशात मोदी सरकारने गॅस, पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीचे विक्रम प्रस्थापित केले असून महागाईचा उच्चांक नोंदवला असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केली.