NCP SP Group Jitendra Awhad Mumbra News: अलीकडेच झालेल्या महानगरपालिका निवडणुकीत मुंब्रा येथून एआयएमआयएम पक्षाचे पाच नगरसेवक निवडून आले. मुंब्रा हा कायमच आमदार जितेंद्र आव्हाड यांचा बालेकिल्ला राहिला आहे. मात्र, महापालिका निवडणुकीत मुंब्रा येथे एमआयएमची एन्ट्री झाल्याचे बघायला मिळाली. एमआयएमकडून महापालिका निवडणूक लढवून नगरसेविका झालेल्या सहर शेख हिने थेट जितेंद्र आव्हाड यांना डिवचले. महानगरपालिका निवडणूक निकालानंतर अनेक दिवसांनी जितेंद्र आव्हाड यांनी मुंब्रा येथे जाऊन शक्तिप्रदर्शन केले. यावेळी मीडियाशी बोलताना जितेंद्र आव्हाडांनी सहर शेख हिला उत्तर देताना मुंब्र्याचा रंग कोणता, हेही सांगितले.
मुंब्र्यात आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या नागरी सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कार्यकर्त्यांनी कोण आया, कोण आया... शेर का शिकारी आया, अशा घोषणा दिल्या. यासंदर्भात जितेंद्र आव्हाड यांना प्रश्न विचारला असता, आज काल प्रत्येक गल्लीबोळात ही घोषणा असते, ही जी नवीन मुले आहेत, ते अशा कल्पक घोषणा करतात. काही जणांनी आव्हान दिले होते, त्यासंदर्भात बोलताना आव्हाड म्हणाले की, हाथी चले अपली चाल, कुत्ते भोके हजार, आव्हान देणे हे लोकांचे काम असते. आपण त्यांच्या आव्हानासाठी काही करत नाही, आपण आपल्या मनाप्रमाणे वागत असतो, असे म्हणत जितेंद्र आव्हाड यांनी सहर शेख यांच्या वक्तव्यावर अधिक बोलणे टाळले.
बालिशपणाचे विधान, सोशल मीडियावर क्रेझ
कैसे हराया..., असे म्हणत सहर शेख हिने विजय जल्लोष साजरा केला होता. या व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला. सहर शेख हिने केलेल्या भाषणाची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चाही झाली. याबाबत जितेंद्र आव्हाड यांना विचारले असता, असे एखादी लहान पोरगी मिश्किलपणाने बोलते तर तिचे फार म्हणजे सोशल मीडियावरती तिच्या बालिशपणाची क्रेझ आहे, तिच्या त्या वक्तव्याला खूप काही अर्थ नाही. म्हणजे माझी लहान पोरगी हसत हसत म्हटली... चॉकलेट लाया.. तर तेही गाजेल त्यात काय विशेष नाही. तसेच हा देश तिरंगा आहे, हा महाराष्ट्र तिरंगा आहे आणि मुंब्रा तिरंगा आहे. संविधानाने तिरंगा रंग दिला आहे. तुम्ही कुठल्याही एका रंगाची मोनोपॉली या देशात आणू शकत नाही, असेही आव्हाड म्हणाले.
दरम्यान, मी शांत आहे. शांत राहू द्या. अन्यथा काही लोकांची झोप उडेल. माझे तोंड उघडू देऊ नका नाही तर काही लोक जेलमध्ये जातील. मी काम केले म्हणून मोठ्या मताने निवडून आलो. काही माझे मित्र हरले मात्र त्याची लढाई आता सुरू झाली आहे. चॉकलेट खायला दिले असे आमचे लोक बोलणार नाही. मात्र लहान मुलीला काही बोलले तर माफ करा, असे आव्हाड म्हणाले.