Ketki Chitale: केतकी चितळेचा ताबा आता मुंबई पोलीस घेणार! कोठडीबाबत उद्या कोर्ट निर्णय देणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2022 21:48 IST2022-05-17T21:48:06+5:302022-05-17T21:48:42+5:30
Ketki Chitale News: अभिनेत्री केतकी चितळे हिच्या पोलीस कोठडीची मुदत बुधवारी संपत असून आता तिचा ताबा मुंबईतील गोरेगाव पोलीस घेणार आहेत. तिला आता पुन्हा पोलीस कोठडी मिळणार की, न्यायालयीन कोठडी हे बुधवारी ठाणे न्यायालयात ठरणार आहे.

Ketki Chitale: केतकी चितळेचा ताबा आता मुंबई पोलीस घेणार! कोठडीबाबत उद्या कोर्ट निर्णय देणार
- जितेंद्र कालेकर
ठाणे : वादग्रस्त अभिनेत्री केतकी चितळे हिच्या पोलीस कोठडीची मुदत बुधवारी संपत असून आता तिचा ताबा मुंबईतील गोरेगाव पोलीस घेणार आहेत. तिला आता पुन्हा पोलीस कोठडी मिळणार की, न्यायालयीन कोठडी हे बुधवारी ठाणे न्यायालयात ठरणार आहे.
ठाण्यातील कळवा पोलीस ठाण्यात केतकी विरुद्ध कलम ५००, ५०१ आणि १५३ अन्वये (बदनामी करणे, तेढ निर्माण करणे) या कलमांखाली गुन्हा दाखल आहे. याच प्रकरणात ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट एकच्या पथकाने तिला १४ मे रोजी अटक केली. तिने फेसबुकवर केलेली पोस्ट ही कोणाच्या सांगण्यावरून केली की,स्वत:च्या मनाने याची अजूनही चौकशी सुरू आहे. हीच चौकशी पूर्ण न झाल्याने ठाणे पोलीस बुधवारी तिच्या वाढीव पोलीस कोठडीची मागणी ठाणे न्यायालयाला करण्याची शक्यता आहे. तिच्याकडून हस्तगत करण्यासारखे काहीच नसल्याने पुन्हा पोलीस कोठडी मिळण्याची शक्यता कमी असल्याचे वकिलांचे मत आहे. ठाणे पोलिसांनी तिला अटक केली, त्याचवेळी गोरेगाव पोलीस तिचा ताबा घेण्यासाठी ठाणे न्यायालयात दाखल झाले होते. त्यामुळे तिला ताब्यात घेण्याबाबतची प्रक्रिया बुधवारी वेळेत पूर्ण केल्यास न्यायालयातून गोरेगाव पोलिसांना केतकीचा ताबा मिळण्याची शक्यता आहे.
पोलीस उपायुक्तांनी केली चौकशी
केतकीने ज्या निखिल भावेची पोस्ट कॉपी केल्याचा दावा केला, त्याबाबतही तिच्याकडे चौकशी झाली. दरम्यान, गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील यांनी मंगळवारी केतकीची चौकशी केली. मात्र,भावेला आपण ओळखत नसल्याचा दावा चौकशी दरम्यान तिने पोलिसांकडे केल्याची माहिती सूत्रांनी दिली.