"मराठी विरुद्ध कितीही मोर्चे काढा, आमचं..."; मनसे विरोधात आंदोलन करणाऱ्यांना राजू पाटलांचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2025 16:39 IST2025-07-03T16:22:25+5:302025-07-03T16:39:49+5:30
मीरा रोडच्या व्यापाऱ्यांच्या मोर्चावरुन मनसे नेते प्रमोद पाटील यांनी इशारा दिला आहे.

"मराठी विरुद्ध कितीही मोर्चे काढा, आमचं..."; मनसे विरोधात आंदोलन करणाऱ्यांना राजू पाटलांचा इशारा
Raju Patil on Mira Bhayandar Trader Protest: मीरा रोडमध्ये अमराठी दुकानदाराला मनसे कार्यकर्त्यांनी केलेल्या मारहाणीमुळे वातावरण तापलं आहे. मराठी बोलण्यास नकार दिल्याने मनसे कार्यकर्त्यांनी दुकानदाराला मारहाण केली होती. त्यानंतर गुरुवारी या मारहाणीच्या निषेधार्थ मीरा भाईंदरमधील व्यापाऱ्यांनी कडकडीत बंद पुकारला. व्यापाऱ्यांनी एकत्र येत अशाप्रकारची मारहाण सहन केली जाणार नसून याविरोधात कारवाई व्हायला हवी अशी मागणी केली. त्यानंतर आता मनसेकडूनही व्यापाऱ्यांच्या बंदला प्रत्युत्तर देण्यात येत आहे. मनसे नेते प्रमोद पाटील यांनी कितीही मोर्चे काढा, आमचं लक्ष आहे असं म्हणत इशारा दिला आहे.
दोन दिवसांपूर्वी मराठीच्या मुद्द्यावरुन मीरा रोड येथील शांती पार्क परिसरात असलेल्या जोधपूर स्वीट्स अँड नमकीन या दुकानाच्या मालकाला मनसे कार्यकर्त्यांनी मारहाण केली होती. त्यानंतर दुकानदाराच्या तक्रारीवरुन पोलिसांनी सात जणांविरोधात गुन्हा दाखल केला. दुसरीकडे या मारहाणीच्या निषेध करण्यासाठी गुरुवारी एकता मंचच्या व्यापाऱ्यांकडून निषेध आंदोलन करण्यात आलं. व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवत मारहाण झालेल्या ठिकाणी एकत्र आले होते. भविष्यामध्ये मराठी भाषेच्या मुद्द्यावरुन इतर कोणासोबतही अस घडू शकतं, त्यामुळे कारवाई व्हायला हवी असं व्यापाऱ्यांनी म्हटलं. मात्र दुसरीकडे मनसे नेते अविनाश जाधव यांनी हा मोर्चा भाजप पुरस्कृत असल्याचे म्हटलं. तर प्रमोद पाटील यांनीही मोर्चे काढणाऱ्यांना इशारा दिला.
मनसे नेते प्रमोद पाटील यांनी एक्स पोस्ट करत आंदोलन करणाऱ्यांना इशारा दिला. "मराठी विरुद्ध कितीही मोर्चे काढा, आमचे लक्ष आहे हे विसरू नका!" असं प्रमोद पाटील यांनी म्हटलं. यासोबत पाटील यांनी पाणी पिणाऱ्या एका वाघाचा फोटो देखील पोस्ट केला आहे.
मराठी विरुद्ध कितीही मोर्चे काढा …..आमचे लक्ष आहे हे विसरू नका !#मीरा_भाईंदर#मराठी#महाराष्ट्रात_मराठीचpic.twitter.com/VIyLffzZmT
— Raju Patil ( प्रमोद (राजू) रतन पाटील ) (@rajupatilmanase) July 3, 2025
व्यापारी मोर्चाला स्थानिक भाजप नेत्यांची फूस - अविनाश जाधव
दरम्यान मनसे नेते अविनाश जाधव यांनीही आंदोलनावरुन भाजपवर टीका केली आहे. "आज जिथे बंद पाळण्यात आला तो एक लहानसा परिसर असून तिथल्या २५ ते ५० व्यापाऱ्यांनी हा बंद पुकारला होता. खरंतर आजचं आंदोलन हे व्यापाऱ्यांचं नाही तर भाजपच्या लोकांचे होते. भाजपमधील स्थानिक नेते, पदाधिकारी, वकील आणि आमदार नरेंद्र मेहतांच्या कुटुंबातील काही लोक आहेत, त्यांनी हे आंदोलन केले. हे भाजपने मराठी माणसाविरोधात केलेलं आंदोलन आहे," असं अविनाश जाधव म्हणाले.