मनसे ‘मविआ’ सहभागी? ठाण्यातील बैठकीत संकेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2025 06:24 IST2025-10-06T06:24:00+5:302025-10-06T06:24:12+5:30
आगामी निवडणुकांमध्ये एकत्र सामोरे जाणे आणि ठाणेकर नागरिकांना भेडसावणाऱ्या प्रश्नांवर आवाज उठविण्याच्या मुद्द्यावर यावेळी चर्चा झाली.

मनसे ‘मविआ’ सहभागी? ठाण्यातील बैठकीत संकेत
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : आगामी ठाणे महापालिका निवडणुकीतील रणनीतीसाठी महाविकास आघाडीने कंबर कसली असून महायुतीविरोधात एकत्र येण्याचे स्पष्ट संकेत त्यांनी दिले. शरद पवार गटाचे आ. जितेंद्र आव्हाड यांच्या ठाण्यातील निवासस्थानी आघाडीतील घटक पक्षांच्या प्रमुख नेत्यांची शनिवारी रात्री बैठक पार पडली. यावेळी काँग्रेस, उद्धवसेना, मनसेचे नेतेही उपस्थित होते. आगामी निवडणुकांमध्ये एकत्र सामोरे जाणे आणि ठाणेकर नागरिकांना भेडसावणाऱ्या प्रश्नांवर आवाज उठविण्याच्या मुद्द्यावर यावेळी चर्चा झाली.
विविध समस्यांवर एकत्रित आवाज उठवून आंदोलन करण्याचा सूर यावेळी पदाधिकाऱ्यांनी लावला. वाढती वाहतूक समस्या, डम्पिंग ग्राउंडचा प्रश्न, पाणीटंचाई, बेकायदा बांधकामे, मेट्रो प्रकल्पातील विलंब, भ्रष्टाचार आदी प्रश्नांवर विरोधी पक्षांनी एकत्रित येत मोर्चा काढण्याबाबत चर्चा झाली.
जागावाटपाचा निर्णय सर्वात शेवटी
बैठकीत जागावाटपात चर्चा झाली नाही. जागावाटप निवडणुका जाहीर झाल्यावरच होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
चारही पक्षांची आज महापालिकेवर धडक
काँग्रेसचे ठाणे शहर अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी सांगितले, ‘आगामी पालिका निवडणुका एकत्रित लढण्याबाबत चर्चा झाली. महापालिकेतील भ्रष्टाचारासह ठाणेकरांना भेडसावणाऱ्या विविध समस्यांबाबत चारही पक्षांनी एकत्रितपणे आवाज उठविण्याचे ठरले आहे.’
निवडणुकीची रणनीतीसह ठाण्यात मनसेला सोबत घेऊन लढणार असल्याचीही माहिती एका नेत्याने दिली. पालिकेतील भ्रष्टाचाराबाबत सोमवारी पहिली धडक पालिकेवर दिली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.