Marathi Morcha: "मराठी माणसावर पोलिसांची दादागिरी अन् गुंडगिरी सुरूये, ती..."; मंत्री प्रताप सरनाईकांना संताप अनावर
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2025 13:10 IST2025-07-08T13:07:50+5:302025-07-08T13:10:53+5:30
Marathi Morcha Mira Bhayandar: मीरा भाईंदरमध्ये मराठी मोर्चाची हाक देण्यात आली होती. मोर्चाला परवानगी नाकारल्यानंतर पोलिसांनी अनेकांना ताब्यात घेतले. त्यावरून शिवसेनेचे मंत्री प्रताप सरनाईक यांनी संताप व्यक्त केला.

Marathi Morcha: "मराठी माणसावर पोलिसांची दादागिरी अन् गुंडगिरी सुरूये, ती..."; मंत्री प्रताप सरनाईकांना संताप अनावर
'शांतता मार्गाने मराठी मोर्चा काढण्यासाठी परवानगी मागितली होती, तर पोलिसांनी ती द्यायला हवी होती. पण, पोलिसांची कालपासून दादागिरी आणि गुंडगिरी सुरू आहे. ती सहन करणार नाही. मी या मोर्चा सहभागी होत आहे. हिंमत असेल, तर पोलिसांनी मला अटक करून दाखवावी', असा संताप शिवसेनेचे मंत्री प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केला.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
मीरा भाईंदरमध्ये मराठी मोर्चाची हाक दिली गेली होती. पण, पोलिसांनी मोर्चाला परवानगी नाकारली. त्यानंतर वातावरण तापले. पोलिसांनी अनेक कार्यकर्त्यांना वेगवेगळ्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनाही ताब्यात घेतले. रात्रभर पोलिसांची धरपकड सुरू होती. त्यावरून प्रताप सरनाईक यांनी पोलिसांवर गुंडगिरीचा आरोप केला आहे.
पोलिसांची गुंडगिरी सहन करणार नाही -प्रताप सरनाईक
प्रताप सरनाईक विधानभवन परिसरात माध्यमांशी बोलताना म्हणाले, "ज्या पद्धतीने पोलिसांनी कालपासून कारवाई सुरू केलीये, ती योग्य नव्हे. मराठी भाषिकांनी जर शांतता मार्गाने मोर्चा काढायला परवानगी मागितली असेल, तर ती त्यांना द्यायला हवी होती. जी दादागिरी आणि गुंडगिरी पोलिसांनी कालपासून चालू केलेली आहे, ती दादागिरी आणि गुंडगिरी त्या परिसराचा आमदार म्हणून प्रताप सरनाईक कधीही सहन करणार नाही", असा इशारा सरनाईक यांनी दिला.
वाचा >>अखंड भारत वाचवण्यासाठी मराठ्यांनी...; निशिकांत दुबेंना CM फडणवीसांनी सांगितला 'महाराष्ट्राचा इतिहास'
"आज सकाळपासून जी काही धरपकड मराठी कार्यकर्त्यांची आणि मराठी लोकांची मीरा भाईंदरच्या पोलिसांनी दादागिरी आणि गुंडगिरीच्या मार्गाने चालू केली आहे. त्याचा मी निषेध करतो. मी मुख्यमंत्र्यांकडेही निषेध व्यक्त करतो", असे सरनाईक म्हणाले.
'हिंमत असेल, तर मला अटक करा'
प्रताप सरनाईक यांनी पोलिसांना अटक करण्याचे आव्हान दिले. ते म्हणाले, "आता मी स्वतः त्या मोर्चामध्ये सामील होण्यासाठी मीरा भाईंदरला जात आहे. जर पोलिसांची हिंमत असेल, तर पोलिसांनी प्रताप सरनाईकला अटक करून दाखवावी", असा संताप सरनाईकांनी व्यक्त केला.