मीरारोड - परप्रांतीय व्यापाऱ्यांनी काढलेल्या मोर्चाविरोधात मराठी भाषिकांकडून मीरारोडमध्ये मोर्चाची हाक देण्यात आली. या मोर्चात मनसे, उद्धवसेना, मराठी एकीकरण समितीसह विविध मराठी भाषिक संघटना रस्त्यावर उतरणार होत्या. मात्र या मोर्चाला पोलिसांकडून परवानगी नाकारण्यात आली. त्याशिवाय मोर्चाचे नेतृत्व करणाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. अनेकांना नोटीस बजावल्या होत्या. १० वाजता मोर्चा स्थळी कार्यकर्ते जमू लागले तेव्हा पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड सुरू झाली. त्यातूनच मीरारोडमध्ये संघर्ष वाढला. या सर्व विरोधाला झुगारून मराठी माणसांनी मोठ्या संख्येने मोर्चाला हजेरी लावली आणि मोर्चाला सुरूवात झाली.
या मोर्चावेळी आंदोलकांनी मराठीचा जयघोष करत सरकारविरोधात घोषणाबाजी केली. पोलिसांनी कितीही अडवले तरी मोर्चा होणारच असा पवित्रा आंदोलकांनी घेतला. पोलिसांनी मोर्चा रोखण्याचा प्रयत्न केला परंतु मोर्चातील लोकांच्या संख्येमुळे त्यांना अडवणे अशक्य झाले. या मोर्चात मनसे, उद्धवसेना, मराठी एकीकरण समितीचे कार्यकर्ते यांनी हजेरी लावली. डोक्यावर पांढरी गांधी टोपी आणि हातात शिवरायांचा भगवा झेंडा घेऊन मोर्चेकरी त्यांनी ठरवलेल्या मार्गावरून मोर्चात चालत होते. या मोर्चात आलेले मनसे नेते अभिजीत पानसे म्हणाले की, आम्हाला मराठी माणसांचा अभिमान आहे. आज या मोर्चात प्रत्येक मराठी माणसाने हजेरी लावली. पोलिसांनी नेत्यांना अटक केली. दडपशाही करण्यात आली. कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले गेले तरीही मराठी माणूस एकवटला. फक्त मीरारोड नव्हे तर राज्यातून जेव्हा मराठी माणसे इथे यायला सुरूवात झाली तेव्हा सरकार घाबरले. मराठी माणसांची एकजूट यापुढे अशीच कायम राहील असं त्यांनी म्हटलं.
मंत्री प्रताप सरनाईक संतापले
मीरारोडमध्ये मराठी भाषिकांचा मोर्चा निघणार होता. त्याला पोलिसांनी परवानगी का नाकारली? असा प्रश्न करत मंत्री प्रताप सरनाईक मीरा-भाईंदर पोलीस आयुक्तांवर संतापले. या मोर्चापूर्वी नेत्यांना नोटीस पाठवल्या. मी पोलीस आयुक्त प्रकाश गायकवाड यांच्याविरोधात मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली आहे. ज्यापद्धतीने पोलिसांनी कारवाई केली ते योग्य नाही. कायद्यानुसार मोर्चासाठी परवानगी मागितली असेल तर त्यांना द्यायला हवी होती. जी दादागिरी आणि गुंडगिरी पोलिसांनी कालपासून सुरू केली, ती दादागिरी या परिसरातील आमदार म्हणून मी प्रताप सरनाईक कधी सहन करणार नाही. सकाळपासून जी धरपकड सुरू आहे त्याचा निषेध करतो. मी स्वत: या मोर्चात सहभागी होण्यासाठी मीरारोडला जाणार आहे. जर पोलिसांमध्ये हिंमत असेल तर मला अटक करून दाखवावी असा इशारा त्यांनी दिला होता.
दरम्यान, मंत्री प्रताप सरनाईक जेव्हा या मोर्चात पोहचले तेव्हा मोठ्या संख्येने त्यांना विरोधाला सामना करावा लागला. मंत्र्यांनी इथून निघून जावे अशी घोषणाबाजी संतप्त कार्यकर्त्यांनी केली. परंतु काही लोक या मोर्चात राजकारण करत आहेत असा आरोप मंत्री प्रताप सरनाईक यांनी केला. उबाठा आणि मनसेचे हे राजकारण सुरूच राहणार आहे. मी मीरा-भाईंदरमधील लोकांसोबत राहणार आहे असं सरनाईक यांनी म्हटलं.