घडामोडींना वेग, काँग्रेसकडून कारवाईचा बडगा; आता अंबरनाथमधील ‘ते’ १२ नगरसेवक भाजपमध्ये येणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2026 05:57 IST2026-01-08T05:57:20+5:302026-01-08T05:57:32+5:30
आम्ही काँग्रेसमध्ये होतो. मात्र, अन्यायामुळे आणि अंबरनाथच्या विकासासाठी आम्ही भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे.

घडामोडींना वेग, काँग्रेसकडून कारवाईचा बडगा; आता अंबरनाथमधील ‘ते’ १२ नगरसेवक भाजपमध्ये येणार
लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे : अंबरनाथ नगरपालिकेत निवडून आलेले काँग्रेसचे १२ नगरसेवक येत्या दोन- तीन दिवसांत भाजपमध्ये प्रवेश करतील, अशी माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी बुधवारी ठाण्यातील पत्रकार परिषदेत दिली.
चव्हाण म्हणाले, अंबरनाथच्या विकासासाठी आणि नागरिकांना दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्यासाठी हे सर्व नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. हा निर्णय कोणत्याही सत्तालोभापोटी नसून, विकासाच्या मुद्द्यावर आहे. अंबरनाथमधील काँग्रेसचे पदाधिकारीही भाजपमध्ये येणार आहेत.
या पत्रकार परिषदेला काँग्रेसकडून निलंबित केलेले अंबरनाथचे ब्लॉक अध्यक्ष प्रदीप पाटील हेही उपस्थित होते. दरम्यान, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी अंबरनाथमधील १२ नगरसेवक, तसेच शहराध्यक्ष प्रदीप पाटील यांना पक्षातून निलंबित केले आणि शहर कार्यकारिणी बरखास्त केली.
आम्ही काँग्रेसमध्ये होतो. मात्र, अन्यायामुळे आणि अंबरनाथच्या विकासासाठी आम्ही भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. - प्रदीप पाटील, गटनेते, काँग्रेस, अंबरनाथ