ठाण्यात कैद्यांच्या बंदोबस्तामध्ये हलगर्जीपणा, नऊ पोलिस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2025 05:17 IST2025-08-09T05:16:57+5:302025-08-09T05:17:56+5:30
मुख्यालयाच्या पोलीस उपायुक्तांचे आदेश: अचानक केलेल्या तपासणीत दोन कैद्यांची अनुपस्थिती संशयास्पद...

ठाण्यात कैद्यांच्या बंदोबस्तामध्ये हलगर्जीपणा, नऊ पोलिस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई
ठाणे : ठाणे कारागृहातील सात कैद्याना वैद्यकीय तपासणीसाठी ठाणे महापालिकेच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात नेल्यानंतर त्याठिकाणी दोन कैद्यांची अनुपस्थिती संशयास्पद आढळली होती. ठाणे शहर मुख्यालयाचे पोलीस उपायुक्त डॉ. पवन बनसोड यांनी केलेल्या अचानक तपासणीमध्ये हा धक्कादायक प्रकार आढळल्यानंतर यामध्ये हलगर्जीपणा करणाऱ्या मुख्यालयातील पोलीस हवालदार गंगाराम घुले यांच्यासह नऊ पोलिसांवर उपायुक्त बनसोड यांनी निलंबनाची कारवाई केल्याची माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दिली.
कळवा येथील ठाणे महापालिकेच्या रुग्णालयात ठाणे जिल्हा मध्यवर्ती कारागृहातील सात कैद्यांना तपासणीसाठी ४ आॅगस्ट २०२५ रोजी नेले होते. त्यावेळी उपायुक्त बनसोड यांनी अचानक या रुग्णालयात कैद्यांची तसेच बंदोबस्तावरील पोलीस अंमलदारांची तपासणी केली. याच तपासणीमध्ये सात पैकी केवळ पाच कैदी आढळले होते. उर्वरित दोघे हे एक्स रे तपासणीसाठी किंवा लघुशंकेसाठी शौचालयात गेल्याची वेगवेगळी उत्तरे बंदोबस्तावरील पोलिसांनी दिली होती. दोन्ही ठिकाणी हे कैदी नव्हते. प्रत्यक्षात नंतर मात्र सातही कैद्यांना ठाणे जिल्हा मध्यवर्ती कारागृहात याच अंमलदारांनी मुख्यालयातील कैदी पार्टीच्या शासकीय वाहनातून सोडल्याचेही आढळले होते. कैदी पार्टीच्या बंदोबस्तामध्ये हाच हलगर्जी आणि बेजबाबदारपणा केल्याचा ठपका ठेवत घुले यांच्यासह नऊ जणांवर निलंबनाची कारवाई बनसोड यांनी केली.
निलंबनाची कारवाई झालेल्यांची अशी आहेत नावे-
ॅहवालदार गंगाराम घुले, गिरीष पाटील, अंमलदार विलास मोहिते, किशोर शिर्के, अशोक मुंडे, संदीप खरात, सुनिल निकाळजे, भरत जायभाये आणि मोटार परिवहन विभाागातील चालक विक्रम जुंबरे अशी कारवाई झालेल्यांची नावे आहेत.
काय आहे आरोप-
- पोलीस उपायुक्तांच्या तपासणीत सात पैकी केवळ पाचच न्यायालयीन बंदी आढळले.
- पाचपैकी एका बंद्याला बेडी न लावता बाहेर बसून ठेवले होते.
- बंद्यांच्या संरक्षण आणि निगराणीऐवजी कैदी पार्टीचे प्रभारी घुले यांनी दोन बंद्यांच्या अनुपस्थितीबाबत वेगवेगळी उत्तरे दिली.
- दोन्ही कैदी क्ष किरण तपासणी किंवा शौचालयातही नव्हते.
- पाच बंद्यांना कारागृहात सोडण्याचे आदेश दिल्यानंतर मात्र सातही कैदी हे एकत्रितपणे ३.५० वाजण्याच्या सुमारास जिल्हा मध्यवर्ती कारागृहात सोडल्याचे आढळले. याच दिशाभूल आणि हलगर्जीपणा केल्याचा ठपका ठेवला आहे.
- कैदीपार्टीतील सर्वांनीच अंतस्थ हेतू साध्य करण्यासाठी हेतूपुरस्सर एकमेकांची सल्लामसलत करुन वरिष्ठांची दिशाभूल केली.