ठाणे: एक महिन्याच्या अंतराने एकाच कुटुंबातील काकी आणि तिची अल्पवयीन पुतणी वागळे इस्टेट येथून हरवल्या होत्या. या प्रकरणाचा तपास ठाणे गुन्हे शाखेकडे वर्ग झाल्यावर त्या दोघींचा शोध घेतलाअसता, त्यातील अल्पवयीन पुतणी बालकुमारी माता झाल्याची धक्कादायक बाब पुढे आली. ती १५ वर्षीय असल्याचे माहीत असतानाही तिच्याशी कोणत्याही प्रकारे विधिवत लग्न न करता लैंगिक अत्याचार करणे व तिचे अपहरण केल्याच्या गुन्ह्याखाली प्रवीण मिश्रा (२२) याला अटक केल्याची माहिती पोलिसांनी दिली.वागळे इस्टेट येथील काकी आणि १५ वर्षीय पुतणी अचानक २०१५ मध्ये गायब झाल्या होत्या. दोघी एकाच ठिकाणी कामाला असल्याने त्यांची चांगली गट्टी जमूनत्या जीवाभावाच्या मैत्रिणी झाल्या. याचदरम्यान, काकी अचानक निघून गेली. तिच्याबाबत पुतणीला माहिती असण्याचा संशय,त्या कुटुंबाला होता. त्यामुळे तिला काकीबाबत विचारणा करून त्रास देणे सुरू झाले होते. त्यालाच कं टाळून तिनेही घर सोडले. तत्पूर्वी ती काम करीत असलेल्या ठिकाणी तिची अटकेतील प्रवीणशी ओळख होती. त्याने तिला लग्नाचे आमिष दाखवून फूस लावून पळून नेले. तसेच मुंब्य्रातील एका मंदिरात लग्न करून ते दिव्यात राहत होते. यादरम्यान तिने एका बाळाला जन्म दिला. त्या दोघींचा शोध लागत नसल्याने ते प्रकरण गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाकडे वर्ग केले. त्यानुसार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र दौंडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक कल्याणी पाटील आणि सहायक पोलीस उपनिरीक्षक राजू महाले, पोलीस नाईक नीशा कारंडे या पथकाने त्यांच्या पार्श्वभूमीचा अभ्यास केला. पहिल्यांदा काकीचा शोध घेण्यात पथकाला यश आले. तिच्या माध्यमातून मग पुतणीचा शोध घेताच ती बालकुमारी माता असल्याचे पुढे आले. याप्रकरणी तिला पळवून नेणे आणि पोक्सोंतर्गत प्रवीणला अटक केली. तसेच त्यांचे डीएनएचे नमुने घेऊन ते तपासणीसाठी पाठवल्याची माहिती पोलिसांनी दिली.पळून गेलेल्या अल्पवयीन मुलांची तक्रार होते. मात्र, ते परत आल्यानंतरही पोलिसांना सांगायला हवे, असे पोलिसांचे म्हणणे आहे. (प्रतिनिधी)
अपहरण झालेली अल्पवयीन मुलगी झाली माता
By admin | Updated: March 20, 2017 02:02 IST