Kalyan Crime: गर्लफ्रेंडचा मोबाईल हॅक केला, अश्लील व्हिडीओ अन् आईवडिलांना धमक्या, २९ वर्षीय तरुणीवर प्रियकरानेच केला बलात्कार
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2025 16:13 IST2025-10-18T16:11:05+5:302025-10-18T16:13:41+5:30
Kalyan Rape Crime News: कल्याणमधील खडकपाडा पोलीस ठाणे हद्दीत ही खळबळ उडवणारी घटना घडली आहे. हे कृत्य करणारा पीडितेचा प्रियकर असून, त्याने राजकीय वापरून आईवडील आणि पीडितेच्या भावालाही धमकी दिली.

Kalyan Crime: गर्लफ्रेंडचा मोबाईल हॅक केला, अश्लील व्हिडीओ अन् आईवडिलांना धमक्या, २९ वर्षीय तरुणीवर प्रियकरानेच केला बलात्कार
Kalyan News: दोघ एकमेकांच्या प्रेमात पडले. त्याने तिला लग्न करण्याचे वचन दिले. पण, नंतर त्याच्यातील नराधम जागा झाला आणि सुरू झाले अत्याचाराचे सत्र. कल्याणमधील खडकपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका २९ वर्षीय तरुणीवर तिच्याच प्रियकराकडून ब्लॅकमेल करत अनेकवेळा बलात्कार करण्यात आला. या नराधमाने तिचा मोबाईल हॅक केला. तिच्यासोबतचे आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी तिच्या आईवडिलांना आणि भावाला दिली. राजकीय पक्षाचा पदाधिकारी असलेल्या आरोपीने गुन्हा दाखल करू नका म्हणून पीडिता आणि तिच्या कुटुंबालाही धमक्या दिल्या. पण, प्रकरण उजेडात आले आणि आरोपीविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
खडकपाडा पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल झाल्यापासून आरोपी फरार आहे. पोलीस आरोपीचा शोध घेत आहे. तो एका राजकीय पक्षाचा पदाधिकारीही आहे. राजकीय वजन वापरत त्याने पीडितेविरोधातच चोरीचा गुन्हा दाखल करून दबाव आणला होता.
तरुणीवर अनेकवेळा बलात्कार, कल्याणमधील प्रकरण काय?
खडकपाडा पोलिसांनी सांगितले की, २९ वर्षीय तरुणी आणि आरोपी यांच्यात मागील काही काळापासून प्रेमसंबंध होते. आरोपीने तिला लग्न करण्याचे वचनही दिले होते. त्यांच्यात अनेकदा शरीरसंबंध राहिले आहेत. पण, आरोपीने तिच्यासोबत शरीरसंबंध ठेवतानाचे व्हिडीओ बनवले आणि फोटोही काढले होते.
आरोपीने तरुणीचा मोबाईल हॅक केला. तो तिच्यावर पाळत ठेवू लागला. त्यानंतर त्याने तरुणीसोबतचे व्हिडीओ, फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत तिच्या आईवडील आणि भावालाही ब्लॅकमेल करणे सुरू केले. त्याने व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत तरुणीवर बलात्कार केला.
आईवडील आणि भावाला जीवे मारण्याची धमकी
एकदा त्याने भेटायला बोलवलं. त्यावेळी तरुणीच्या हाती त्याचा मोबाईल लागला. त्यात इतर मुलींसोबतचेही अश्लील व्हिडीओ तिला दिसले. व्हिडीओ बघितल्यानंतर तरुणी हादरली. तिने त्याचा मोबाईल स्वतःकडेच ठेवला. आरोपी चिडला. नंतर तो थेट तिच्या घरी गेला आणि तरुणीच्या आईवडील व भावाला जीवे मारण्याची धमकी दिली.
इतकंच नाही तर तरुणीने माझा मोबाईल चोरल्याचा गुन्हा त्याने पोलिसांना राजकीय वजन वापरून दाखल करायला लावला. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणात तरुणीची चौकशी केली. त्यावेळी तिने झालेल्या अत्याचाराची आणि आरोपीकडून दिल्या जात असलेल्या धमक्याची कहाणी सांगितली. त्याच्या मोबाईलमधील व्हिडीओही पोलिसांना मिळाले. त्यानंतर पोलिसांनी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला.
पोलिसांनी सगळे प्रकरण कळल्यानंतर आरोपीविरोधात बलात्कार आणि इतर कलमान्वये गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल झाल्याचे कळताच आरोपी फरार झाला. सध्या खडकपाडा पोलीस त्याचा शोध घेत आहे.