"...तर शिवसैनिक तुम्हाला पळवून लावतील"; शिंदेसेनेचा भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांना इशारा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2025 11:32 IST2025-12-04T11:31:27+5:302025-12-04T11:32:14+5:30
एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी बोलून युती केली आहे. हा वरिष्ठांचा विषय आहे. त्यावर बोलण्याची क्षमता रवींद्र चव्हाणांची आहे का त्याचे उत्तर द्यावे असा टोला राजेश कदम यांनी लगावला.

"...तर शिवसैनिक तुम्हाला पळवून लावतील"; शिंदेसेनेचा भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांना इशारा
डोंबिवली - कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदेसेना आणि भाजपा यांच्यातील संघर्ष शिगेला पोहचला आहे. एकमेकांचे नेते पक्षात घ्यायचे नाहीत असं ठरलेले असतानाही भाजपाकडून शिंदेसेनेवर कुरघोडीचा प्रकार सुरू आहे. कल्याण ग्रामीणसह डोंबिवलीत शिंदेसेनेला धक्का देत अनेक पदाधिकाऱ्यांनी भाजपात प्रवेश केला आहे. मात्र पैशाचे आमिष दाखवून, महामंडळे, महापौर, विविध पॅकेज देऊन रवींद्र चव्हाण शिंदेसेनेतील नेत्यांना फोडत आहेत. यापुढे शिवसैनिक तुम्हाला पळवून लावतील असा इशारा शिंदेसेनेचे जिल्हाप्रमुख राजेश कदम यांनी दिला आहे.
कल्याण ग्रामीणचे आमदार राजेश मोरे यांच्यासह जिल्हाप्रमुख राजेश कदम यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यात ते म्हणाले की, भाजपासारख्या शिस्तप्रिय आणि जगातील नंबर एकच्या पक्षामध्ये रवींद्र चव्हाण यांना युतीवर बोलण्याचा अधिकार आहे का? शिवसेना-भाजपा युती नैसर्गिक विचारांवर आधारित आहे. एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी बोलून युती केली आहे. हा वरिष्ठांचा विषय आहे. त्यावर बोलण्याची क्षमता रवींद्र चव्हाणांची आहे का त्याचे उत्तर द्यावे असा टोला त्यांनी लगावला.
तसेच शिंदेसेना आणि भाजपात फूट पाडण्याचं काम रवींद्र चव्हाण का करतायेत? याचेही उत्तर आम्हाला हवे. डोंबिवली हा त्यांचा मतदारसंघ आणि मालवण त्यांचे गाव आहे या दोन्ही ठिकाणी युतीत आग लावण्याचं काम रवींद्र चव्हाण करत आहेत. डोंबिवलीतही न सांगता आमच्या पक्षाचे उमेदवार पळवायचे, विविध आमिषे दाखवायची, पैसे द्यायचे, महापौरपद, आमदारकी देतो अशा विविध ऑफर देऊन पक्षातील नेते फोडले. एकनाथ शिंदे यांनी आम्हाला संयम पाळायला सांगितले आहे. रवींद्र चव्हाण हे केवळ इतर पक्षातील नेते पळवत नाहीत, तर कामेही पळवत असल्याचं दिसून येते. खासदार श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून होणारी विकासकामे स्वत:च्या नावावर दाखवण्याचे म्हणजे कामाची चोरी करण्याचं काम रवींद्र चव्हाण करतायेत असा आरोप शिंदेसेनेचे राजेश कदम यांनी लावला.
दरम्यान, डोंबिवली सुशिक्षित नगरी आहे. इथे संघाची विचारधारा आहे. याठिकाणी गुंडगिरी पसरवून कुठला संदेश देण्याचा ते प्रयत्न करतायेत. युती अभेद्य असली तरी शिवसेना हा राखेतून उभा राहिलेला पक्ष आहे. तुम्ही १ नेला तर १०० शिवसैनिक उभे होऊ शकतात. त्याचा प्रत्यय तुम्हाला २ दिवसापूर्वी आला. आमच्या विकास म्हात्रे यांनी तुम्हाला पळवून लावले. यापुढे प्रत्येक ठिकाणी शिवसैनिक तुम्हाला पळवून लावतील हे रवींद्र चव्हाणांनी लक्षात ठेवावे असा इशाराही जिल्हाप्रमुख राजेश कदम यांनी दिला.