मते अधिकृत, तर मग इमारती अनधिकृत कशा?- उद्धव ठाकरे
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2020 06:21 IST2020-02-07T02:15:30+5:302020-02-07T06:21:57+5:30
क्लस्टरकडे देशाचे लक्ष

मते अधिकृत, तर मग इमारती अनधिकृत कशा?- उद्धव ठाकरे
ठाणे : ठाण्यात इमारती अनधिकृत आहेत, परंतु तिथे राहणाऱ्या माणसांची मते अधिकृत की अनधिकृत, असा सवाल करीत मते अधिकृत असतील, तर त्या इमारती अनधिकृत कशा, असा अजब तर्क मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी ठाण्यात मांडला.
ठाण्यातील किसननगर येथे देशातील पहिल्या नागरी समूह विकास योजनेचे (क्लस्टर) भूमिपूजन त्यांच्या हस्ते पार पडले. तीन विचारांचे एकत्र आलेले हे सरकार देशाला एक दिशा दाखवत असल्याचा अभिमान आहे. महाराष्ट्र हे प्रत्येक क्षेत्रात दिशा दाखवत आहे. तसेच हे सरकार राष्ट्राची दिशा ठरवून राजकारणाला दिशा दाखवत आहे.
ठाण्यातील क्लस्टर प्रकल्प देशातील सर्वात मोठा प्रकल्प आहे. त्याकडे मुंबई, ठाणेच नव्हे तर देशाचे लक्ष लागले आहे. जनतेचे कृपाशीर्वाद लाभले नाही तर आमची ओळख काय? असा प्रश्न ठाकरे यांनी केला. हा प्रकल्प एक धाडसी पाऊल आहे. ते धाडस करण्यासाठी आपल्याकडे मर्द आहेत, अशा शब्दांत त्यांनी नगरविकासमंत्री एकनाथ शिंदेंचे कौतुक केले.
घरांचा ताबा कायमस्वरुपी
आजचा दिवस हा महत्त्वाचा असून आनंदाचाही आहे. क्लस्टरचा शुभारंभ झाला, याचा आनंद आहे. या प्रकल्पातील सर्व त्रुटी दूर झाल्या असून त्यात मिळणारे घर ३२३ चौरस फुटांचे असून कायमस्वरूपी मिळणार असल्याची माहिती पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.