कर्जाने घेतलेली वाहने अल्प किंमतीत देण्याच्या अमिषाने पाच लाखांची फसवणूक
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2025 18:02 IST2025-11-18T18:01:10+5:302025-11-18T18:02:24+5:30
दोघांना अटक: वागळे इस्टेट पोलिसांची कारवाई, सात वाहने जप्त

कर्जाने घेतलेली वाहने अल्प किंमतीत देण्याच्या अमिषाने पाच लाखांची फसवणूक
बँकेतूल कर्जाने घेतलेली वाहने अल्प किंमतीत देण्याच्या अमिषाने संदीप गलांडे (४२) यांच्यासह नऊ जणांची पाच लाख ४० हजारांची फसवणूक करणाºया ज्ञानेश्वर कोळी (४०) आणि दिनेश पाटील (४३) या दोघांना वागळे इस्टेट पोलिसांनी अटक केल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवाजी गवारे यांनी मंगळवारी दिली. त्यांना १९ नोव्हेंबरपर्यत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.
ठाण्यातील वागळे इस्टेट लुईसवाडी भागातील रहिवाशी गलांडे यांना कोळी आणि पाटील यांनी नविन स्कूटर दाखवून आरटीओच्या ट्रान्सफरची कार्यवाही पूर्ण करून एक महिन्याच्या आत देण्याचा दावा करीत गलांडे यांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर त्यांना वेळोवेळी त्यांच्या व्हॉटसअप क्रमांकावर वेगवेगळया मोटारसायकलींचे फोटो पाठवून त्यांच्याकडून आॅनलाईन आणि रोख स्वरुपात एका स्कूटरसाठी ६० हजार रुपये अशा नऊ दुचाकींचे पाच लाख ४० हजारांची फसवणूक केली. प्रत्यक्षात त्यांना कोणतीही दुचाकी दिली नाही. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर गलांडे यांनी याप्रकरणी वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहिता कलम ४२०, ४०६, ३४ नुसार ज्ञानेश्वर आणि दिनेश या दोघांविरुद्ध फसवणूकीचा गुन्हा दाखल केला होता.
या गुन्हयाचे गांभीर्य पाहून वागळे इस्टेट परिमंडळ पाचचे पोलीस उपायुक्त प्रशांत कदम, वरिष्ठ पोलीस निरीक्षक गवारे आणि निरीक्षक शिवानंद देवकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरक्षक ज्योतीराम भोसले यांच्या पथकाने तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आधी १५ नोव्हेंबर रोजी शिंदखेडा (जि. धुळे) येथून मुख्य सूत्रधार ज्ञानेश्वर याला अटक केली. त्यापाठोपाठ दिनेशला बदलापूरमधून १६ नोव्हेंबर रोजी ताब्यात घेतले.
दुचाकीच्या मालकांनाही गंडा
सखोल चौकशीमध्ये याच आरोपींनी मोटारसायकलींच्या मुळ मालकांनाही पैशांची गरज असल्याचे ओळखून त्यांना बँकेचे कर्ज मंजूर करुन देतो असे सांगितले. त्यांना थोडे पैसे देत त्यांच्या नावावरील दुचाकीही स्वत:कडे ठेवल्या. त्याच दुचाकींच्या आधारे गलांडे यांच्यासह अन्य नागरिकांची फसवणूक केल्याची बाब उघड झाली. फसवणूकीतील नऊ स्कूटरपैकी चार लाख २० हजारांच्या सात दुचाकी आरोपींकडून हस्तगत केल्या आहेत.