झोपा काढा आंदोलनानंतर उशिराने का होईना पण अखेर पालिकेला जाग आली; मीरारोडमध्ये फेरीवाल्यांवर कारवाई 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 9, 2022 05:40 PM2022-01-09T17:40:21+5:302022-01-09T17:40:53+5:30

मीरारोड भागातील प्रभाग समिती ४ च्या हद्दीतील अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करून हातगाड्या जेसीबीने तोडून टाकण्यात आल्या आहेत.

finally mira bhayandar corporation takes actions on peddlers | झोपा काढा आंदोलनानंतर उशिराने का होईना पण अखेर पालिकेला जाग आली; मीरारोडमध्ये फेरीवाल्यांवर कारवाई 

झोपा काढा आंदोलनानंतर उशिराने का होईना पण अखेर पालिकेला जाग आली; मीरारोडमध्ये फेरीवाल्यांवर कारवाई 

Next

लोकमत न्यूज नेटवर्क 

मीरारोड - मीरारोड भागातील प्रभाग समिती ४ च्या हद्दीतील अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करून हातगाड्या जेसीबीने तोडून टाकण्यात आल्या आहेत . प्रभाग समिती क्र . ४ मध्ये मोठ्या प्रमाणात अनधिकृत फेरीवाले व अतिक्रमण होत असताना प्रभाग अधिकारी मात्र सातत्याने त्यास संरक्षण देत असल्याचे आरोप करत मराठी एकीकरण समितीने झोपा काढा आंदोलन केले होते .  त्या नंतर देखील तब्बल १५ दिवसांनी का होईना पालिकेला जाग येऊन कारवाई सुरु झाली . 

मीरारोडच्या प्रभाग समिती ४ च्या हद्दीत रस्ते व पदपथ हे फेरीवाल्यांच्या अतिक्रमणाने व्यापलेले आहेत . त्या बाबत सातत्याने तक्रारी करून देखील फेरीवाल्यांशी असणारे अर्थपूर्ण लागेबांधे पाहता प्रभाग अधिकारी कांचन गायकवाड कारवाई करत नसल्याचा आरोप मराठी एकीकरण समितीचे प्रदीप सामंत , गोवर्धन देशमुख , सचिन घरत, रविंद्र भोसले, पुरुषोत्तम मोरे, संतोष पाचरणे, निरंजन नवले आदींनी चालवला होता . 

फेरीवाल्यांसह आरक्षणातील अतिक्रमणना संरक्षण व गुन्हे दाखल न करणे, नागरिकांच्या तक्रारींची दखल न घेणे आदी मुद्द्यांवर समितीने प्रभाग कार्यालयात झोपा काढो आंदोलन केले होते . त्यावेळी गायकवाड यांनी कारवाईचे आश्वासन दिले होते . विशेष म्हणजे रामदेव पार्क , हाटकेश आदी भागात पालिकेने मंडई बांधलेली असताना देखील बाहेर मोठ्या संख्येने बेकायदा फेरीवाल्यांच्या हातगाड्या लागत आहेत . 

झोपा काढा आंदोलना नंतर देखील तब्बल १५ दिवसांनी पालिकेला जाग आली. शुक्रवारी सायंकाळ पासून कारवाईला सुरवात केली . रात्री पर्यंत कारवाई सुरु होती . हाटकेश, रामदेव पार्क , न्यू गोल्डन नेस्ट पालिका क्रीडा संकुल , सिनेमॅक्स परिसर , इंद्रलोक  आदी भागातील फेरीवाल्यांवर प्रभाग अधिकारी गायकवाड यांनी मोठ्या फौजफाट्यासह फेरीवाल्यांवर कारवाई केली . यावेळी सुमारे ७५ हातगाड्या व ५ टपऱ्या  जेसीबीने तोडून टाकण्यात आल्याची माहिती पालिकेने दिली .  

कारवाई दरम्यान फेरीवाल्यांनी हुज्जत घालत अडथळा आणण्याचा प्रकार घडला . तर पालिकेच्या कारवाईची सुरवात होताच अनेक फेरीवाले आपल्या हातगाड्या घेऊन पळून गेले .  पालिकेच्या कारवाईचे स्वागत करून या पुढे देखील सातत्याने व ठोस कारवाई करून प्रभाग समिती ४ मधील रस्ते - पदपथ मोकळे ठेवावेत, गुन्हे दाखल करावेत अशी मागणी एकीकरण समितीने केली आहे .

Web Title: finally mira bhayandar corporation takes actions on peddlers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.