कल्याणमधील ‘डुरकी’नं पोलीस हैराण

By Admin | Updated: September 7, 2016 02:46 IST2016-09-07T02:46:36+5:302016-09-07T02:46:36+5:30

गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी बाजारपेठ पोलीस ठाण्यातील फोन खणखणला... दोन मोकाट गाई फिरत आहेत त्यांना आवरा.

Durga police station in Kalyan | कल्याणमधील ‘डुरकी’नं पोलीस हैराण

कल्याणमधील ‘डुरकी’नं पोलीस हैराण

कल्याण : गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी बाजारपेठ पोलीस ठाण्यातील फोन खणखणला... दोन मोकाट गाई फिरत आहेत त्यांना आवरा. त्यांचे काही बरेवाईट झाले तर ऐन उत्सवात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल... तेव्हापासून या गाईंचा शोध सुरू झाला... त्यापैकी एक गाय गोशाळेत धाडलीही. मात्र दुसरी काळ््या रंगाची गाय दूरवरून पोलिसांची जीप किंवा पोलीस दिसला तरी सुसाट वेगानं पळ काढते... तिला जेरबंद करण्याकरिता गेली तीन दिवस पोलीस रात्र
जागवत असून तिनं त्यांचं घामटं काढल आहे...
कल्याण पश्चिम भाग मुस्लिमबहुल आहे. सध्या शहरात गणेशोत्सव धूमधडाक्यात साजरा होत आहे. राज्यात गोवंश हत्या बंंदी आहे. काही दिवसांपूर्वी अंबरनाथमध्ये गोमांस आढळून आल्याने मनसेच्या एका पदाधिकाऱ्याला अटक करण्यात आली. ही सगळी पार्श्वभूमी असताना गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी बाजारपेठ पोलीस ठाण्यातील लॅण्डलाईन खणखणली.
पलीकडच्या व्यक्तीने आपल्या परिचयासह पोलिसाला सांगितले की, तुमचे पोलीस ठाणे संवेदशील आहे. उद्यापासून गणेशोत्सव सुरु होत आहे. दोन मोकाट गाई सध्या फिरत असून त्यांचे काही बरे-वाईट झाले तर कायदा आणि सुव्यवस्था बिघडू शकते. उत्सवाला गालबोट लागू शकते. त्यामुळे त्या गाईंचे काय करायचे ते तुम्ही बघा.
या फोनमुळे बाजारपेठ पोलिसांची झोपच उडाली. फोनची हकीकत वरिष्ठांच्या कानी गेल्यावर त्यांनीही गाईंना ताब्यात घेण्याचे आदेश दिले. त्यामुळे पोलिसांनी गाईंचा तपास करण्याकरिता परिसर पिंजून काढला. त्यापैकी एक गाय पोलिसांच्या हाती लागली. तिला पकडून पोलिसांनी गोशाळेत धाडले. दुसरी गाय ही काळ््या रंगाची आहे. मात्र ती पोलिसांची डाळ शिजू देत नाही.
गाईचा दिवसा पाठलाग सुरू केला तर लोकांमध्ये पोलीस हा चेष्टेचा विषय होईल या भीतीने रात्रीच्या वेळी पोलीस या गाईचा पाठलाग करतात.
पोलिसांची गाडी दूरवर दिसली तरी ही गाय पळ काढते. दोन रात्री हाच अनुभव आल्यावर आता ही काळी गाय दिवसभर कुठे असते, कुठे बसते, या तिच्या हालचालींवर पाळत ठेवण्यासाठी एक पोलीस तिच्या मागे मागे फिरत आहे. दिवसाही पोलिसांची गाडी दिसली तरी ही गाय पळून दुर्गाडी परिसरात जाऊन बसते.
गाय पकडण्यासाठी पोलिसांकडे यंत्रणा नाही. कल्याण-डोंबिवली महापालिकेकडे अशी काही यंत्रणा असल्यास त्यांनी ती उपलब्ध करुन द्यावी, अशी मागणी पोलिसांनी महापालिका प्रशासनाकडे केली आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Durga police station in Kalyan