चिमण्यांच्या संवर्धनासाठी डोंबिवलीकर तरूणाची धडपड

By Admin | Updated: May 12, 2014 01:23 IST2014-05-11T19:34:33+5:302014-05-12T01:23:43+5:30

जान्हवी मोर्ये

Dombivlikar youth struggle for the promotion of sparrows | चिमण्यांच्या संवर्धनासाठी डोंबिवलीकर तरूणाची धडपड

चिमण्यांच्या संवर्धनासाठी डोंबिवलीकर तरूणाची धडपड

जान्हवी मोर्ये
डोंबिवली - शहरातील चिमण्या वाचविण्यासाठी डोंबिवलीतील तरूण शैलेंद्र भगत याने पुढाकार घेऊन जनजागृती मोहिम हाती घेतली आहे. पर्यावरणातील अन्नसाखळी टिकून चिमण्या जगविणे हाच त्याचा मुख्य उद्देश आहे. नागरीकरणामुळे होणार वृक्षांची कत्तल, मोबाईल टॉवरची वाढती संख्येमुळे चिमण्यांच्या जिवितावर विपरित परिणाम असून त्यांना घरटी व चारा पाणी मिळत नाही. ही सगळी परिस्थिती लक्षात घेता महापालिकेने शहरात बांबू आणि बाभळीची झाडे लावावीत, विविध चौकांसह व मोक्याची ठिकाणी चिमण्यांसाठी दाणे व पसरट भांड्यात पाणी भरून ठेवावे, अशी मागणी त्याने महापालिकेचे उद्यान निरिक्षक संजय जाधव यांच्याकडे केली आहे़
मोबाईल टॉवरच्या उत्सर्गामुळे (रेडीएशन) चिमण्यांसारखा लहानचा जीव धोक्यात आला आहे. कल्याण-डोंबिवली शहरात पाचशे पेक्षा जास्त मोबाईल टॉवर असल्याने शहरातील चिमण्यांच्या जीवितावर त्यांचा विपरीत परिणाम होत असल्याचे त्याने म्हटले आहे़
लहानपणापासून पक्ष्याविषयी प्रेम असलेल्या शैलेंद्र हा सध्या एका खाजगी कंपनीत कामाला आहे. लहानपणी त्यांच्या आई-वडिलांनी त्यांच्यावर टाकलेल्या संस्कारातून तो दररोज चिमण्यांना पाणी व धान्याचे दाणे टाकत होता. दीड वर्षापूर्वी तो दिल्लीला काही कामानिमित्त गेला होता. त्यावेळी त्यांच्या वचनात पक्षी निरीक्षणाचा एक अहवाल हाती आला. त्यात पक्ष्यांची संख्या झपाट्याने वाढत चाललेल्या नागरिकरणामुळे रोडावत चालली आहे. त्याची माहिती त्याने गुगलवर ही घेतली. त्यानंतर त्याच्यातील पक्षीप्रेमी जागा झाला अन त्याने ही मोहीम हाती घेतली़
यासंदर्भात एक घटना कथन करताना त्यांने सांगितले की, मागील महिन्यात रामनगर परिसरातील रस्त्यालगत येणारी झाडे कंत्राटदाराने तोडली. ही झाडे जुनी होती. त्यावर अनेक पक्ष्यांची घरटी होती. ती नष्ट झाली. पक्ष्यांचे घर उजाड झाले. तोडण्यात आलेल्या झाडांच्या बदल्यात कंत्राटदाराने दुसर्‍या ठिकाणी झाडे लावणे आवश्यक होते. त्याची पूर्तता कंत्राटदाराने केलेली नाही.

चौकट :- रविवारी डोंबिवली पूर्वेतील मोर्विका साडी सेंटरवर चिमण्या वाचविण्यासाठी शैलेंद्र जनजागृती करणार आहे. या एकांड्या शिलेदाराच्या जनजागृतीला इतर पक्षी मित्रांची साथ मिळाल्यास ही मोहिम अधिक व्यापक होण्यास मदत होईल, अशी अपेक्षा पक्षीप्रेमींकडून व्यक्त केली जात आहे.

Web Title: Dombivlikar youth struggle for the promotion of sparrows