आता म्हाडाप्रमाणेच सिडकोचीही परवडणारी घरे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला विश्वास
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2025 10:53 IST2025-10-12T10:48:56+5:302025-10-12T10:53:01+5:30
या सोडतीत ५ हजार ३५४ घरांसाठी एकूण एक लाख ८४ हजार ९९४ अर्ज प्राप्त झाले. ही संख्या म्हाडावर सर्वसामान्यांचा वाढता विश्वास दर्शवणारी असल्याचेही ते म्हणाले.

आता म्हाडाप्रमाणेच सिडकोचीही परवडणारी घरे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला विश्वास
ठाणे : म्हाडा सर्वसामान्यांना परवडणारी घरे तयार करते. परंतु, सिडकोची घरे ही सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर आहेत. त्यामुळे सिडकोच्या घरांसाठी अर्ज करताना सर्वसामान्यांना विचार करावा लागतो. परंतु, आता म्हाडाप्रमाणे सिडकोच्या माध्यमातून सर्वसामान्यांना परडवतील अशी घरे उभारण्यात येतील, असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी व्यक्त केला.
ठाण्यातील डॉ. काशिनाथ घाणेकर येथे आयोजित करण्यात आलेल्या म्हाडाच्या कोकण विभागीय घरांच्या सोडतीप्रसंगी ते बोलत होते. यावेळी परिवहनमंत्री प्रताप सरनाईक, खासदार नरेश म्हस्के, आमदार निरंजन डावखरे, म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल आदींसह इतर पदाधिकारी उपस्थित होते. सामान्य माणसाच्या घराचे स्वप्न साकार करणे हे आमचे ध्येय आहे. म्हाडा ही केवळ गृहनिर्माण संस्था नाही, तर जनतेच्या विश्वासाची शिदोरी असल्याचेही ते म्हणाले.
पारदर्शक पद्धतीने काम
या सोडतीत ५ हजार ३५४ घरांसाठी एकूण एक लाख ८४ हजार ९९४ अर्ज प्राप्त झाले. ही संख्या म्हाडावर सर्वसामान्यांचा वाढता विश्वास दर्शवणारी असल्याचेही ते म्हणाले. घर म्हणजे प्रत्येक कुटुंबाच्या आत्मसन्मानाचा पाया आहे. म्हणूनच पारदर्शक पद्धतीने घर वाटप केले जात असल्याचेही शिंदे म्हणाले.
पूर्वी काही विकासकांनी प्रकल्प रखडवून ठेवले होते, मात्र आता तीन वर्षांचे भाडे आगाऊ देण्याची अट घालूनच विकासकांना कामे दिली जाणार आहेत. त्यामुळे वेळेत प्रकल्प पूर्ण होऊन घर वाटप होईल आणि घराचे स्वप्नही साकार होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.