ऐसपैस रस्त्यांना खोदकामांचा शाप; तलावांचे शहर बनले वाहनकोंडीचे डेस्टिनेशन
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2026 06:55 IST2026-04-27T06:54:42+5:302026-04-27T06:55:15+5:30
सकाळी व संध्याकाळी ठाणेकरांचा पाच किलोमीटरचा प्रवास कमीतकमी अर्धा ते पाऊण तासावर जातो, तोपर्यंत डोंबिवलीकर घरी पोहोचलेले असतात.

ऐसपैस रस्त्यांना खोदकामांचा शाप; तलावांचे शहर बनले वाहनकोंडीचे डेस्टिनेशन
योगेश बिडवई
उप-वृत्तसंपादक
ठाणे शहरात गेल्या काही वर्षांत कोट्यवधी रुपये खर्चून रस्ते ऐसपैस झाले आहेत. ठाणेकरांना म्हणायला मोठे रस्ते असले तरी ठिकठिकाणची दुरुस्ती कामे, काही रस्त्यांवर दोन्ही बाजूंनी केलेली पार्किंग आणि हे कमी म्हणून की काय मेट्रोच्या कामासाठी ठिकठिकाणी केलेले खोदकाम यामुळे शहरात वाहतुकीचा पुरता बोजवारा उडाला आहे. त्यात लेन कटिंग करणारे आणि राँग साइडने वाहन चालविणारे ठाणेकरांच्या कोंडीत आणखी भर घालीत आहेत.
सकाळी व संध्याकाळी ठाणेकरांचा पाच किलोमीटरचा प्रवास कमीतकमी अर्धा ते पाऊण तासावर जातो, तोपर्यंत डोंबिवलीकर घरी पोहोचलेले असतात. जवळपास सर्वच मुख्य रस्त्यांवर सुरू असलेली कामे पावसाळ्यापूर्वी संपतील, याची काही शाश्वती नाही. नितीन कंपनी चाैकातील सेवा रस्त्याला लागूनच मेट्राेच्या कामासाठी खाेदकाम केले जात आहे. त्यामुळे हा रस्ता नितीन कंपनी ते अग्निशमन दलापर्यंत अर्धाच झाला आहे. काेरम माॅल ते कॅडबरी कंपनी चाैकापर्यंत केबल वाहिनीच्या कामासाठी पुन्हा रस्ता खोदला आहे. कॅडबरी चाैकातही मेट्राेसाठी खाेदकाम केले आहे. विवियाना माॅलकडे जाणाऱ्या रस्त्यावरही खाेदकाम. एवढे पुरेसे नाही, तर कासारवडवली, पातलीपाडा ते मानपाडा आणि मानपाडा ते पातलीपाडा या मार्गावर रस्ते दुरुस्तीसाठी खाेदकाम झाले आहे.
उन्हाचा तडाखा वाढल्याने वाहतूक कोंडीत ठाणेकर घामाघूम होत आहेत. रस्त्याच्या दुतर्फा पार्किंगसाठी वाहनधारकांना जणू परवानाच मिळाला आहे. कॅडबरी ते कोरम मॉलचा रस्ताही मेट्रोच्या खोदकामामुळे जर्जर झाला आहे. मानपाडा उड्डाणपुलाच्या बाजूचा रस्ता दुरुस्तीसाठी बंद आहे. ठाण्यातील रस्त्यावरील खोदकाम पाहिल्यानंतर कुंभमेळानगरी नाशिकची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. कुंभमेळ्याच्या कामासाठी अख्खे नाशिक शहर खोदून काढले आहे. तेथे नाशिककरांनी त्याविरोधात आवाज उठविला आहे. मात्र, ठाणेकर खूपच सोशिक. रोजच्या वाहतूक कोंडीवर काही बोलायला तयार नाहीत. सत्ताधारी विकासकामांमध्ये मग्न आहेत आणि विरोधकांना हा प्रश्न मांडावासा वाटत नाही. मुंबईची ‘सिस्टर सिटी’ म्हटले जाणाऱ्या ठाण्याचे हे दुर्दैव नाही तर दुसरे काय?
तलावांचे शहर बनले वाहनकोंडीचे डेस्टिनेशन
तलावांचे शहर ठाणे आता वाहतूक कोंडीचे डेस्टिनेशन बनले आहे. याकडे ना पोलिसांच्या वाहतूक विभागाचे लक्ष, ना प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून काही हालचाल. सार्वजनिक बांधकाम विभाग, एमएमआरडीए आणि ठाणे महानगरपालिकेचे काम जणू रस्ते खोदणेच हेच आहे, असे चित्र दिसते. मेट्रोने कामाची गती वाढविणे आवश्यक आहे. जानेवारी २०२६ मध्ये सुरू होणारी मेट्रो एप्रिल संपत आला तरी सुरू झालेली नाही.