चौफेर टीका, भाजपाची नाचक्की, अखेरीस स्वीकृत नगरसेवक तुषार आपटे याने दिला राजीनामा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2026 15:44 IST2026-01-10T15:43:25+5:302026-01-10T15:44:26+5:30
Tushar Apte Resigns News: बलापूरमध्ये झालेल्या अल्पवयीन मुलींवरील लैंगिक अत्याचार प्रकरणातील सहआरोपी असलेल्या तुषार आपटे याची भाजपाने स्वीकृत नगरसेवकपदी वर्णी लावल्याने कालपासून संताप व्यक्त करण्यात येत होता. तसेच मनसेसह विविध संघटनांनी याविरोधात आंदोलनाची इशारा दिला होता.

चौफेर टीका, भाजपाची नाचक्की, अखेरीस स्वीकृत नगरसेवक तुषार आपटे याने दिला राजीनामा
गतवर्षी बदलापूरमधील एका प्रसिद्ध शाळेत अल्पवयीन मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या घटनेमुळे देशभरात खळबळ उडाली होती. याच प्रकरणातील सहआरोपी असलेल्या तुषार आपटे याची भाजपाने स्वीकृत नगरसेवकपदी वर्णी लावल्याने कालपासून संताप व्यक्त करण्यात येत होता. तसेच मनसेसह विविध संघटनांनी याविरोधात आंदोलनाची इशारा दिला होता. दरम्यान, या प्रकरणी भाजपाची नाचक्की झाल्यानंतर आज अखेरीस तुषार आपटे याने आपल्या पदाचा राजीनामा मुख्याधिकाऱ्यांकडे सोपवला.
राजीनामा दिल्यानंतर तुषार आपटे याने सांगितले की, मी स्वीकृत नगरसेवक पदाचा राजीनामा दिला आहे. आदर्श विद्यामंदिर शाळेला आणि भारतीय जनता पक्षाला कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये, यासाठी मी हा राजीनामा दिला आहे. शाळेची आणि पक्षाची कुठल्याही प्रकारची बदनामी होऊ नये यासाठी मी स्वेच्छेने हा राजीनामा देत आहे, असेही तुषार आपटे याने सांगितले.
गेल्या महिन्यात झालेल्या बदलापूर नगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपाच्या रुचिता घोरपडे या नगराध्यक्षपदी निवडून आल्या होत्या. त्यानंतर नुकत्याच झालेल्या उपनराध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपाचा मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या प्रियांका दामले यांची उपनगराध्यक्षपदी निवड झाली होती. तर भाजपाकडून स्वीकृत नगरसेवक म्हणून तुषार आपटे यांची निवड झाली होती.
दरम्यान, ऑगस्ट २०२४ मध्ये बदलापूरच्या एका नामांकित शाळेत दोन लहान मुलींवर अत्याचार झाला होता. मुख्य आरोपी अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरनंतर, शाळेचे अध्यक्ष उदय कोतवाल आणि सचिव तुषार आपटे यांनी हा प्रकार लपवल्याचा ठपका ठेवत त्यांच्यावर पोक्सो (POCSO) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झाला होता. ४० दिवस फरार राहिल्यानंतर अटक झालेले आपटे सध्या जामिनावर बाहेर आहेत.