Corona Virus: ‘गडकरी’ला कोरोनाचे कुलूप; गर्दी टाळण्यासाठी केल्या उपाययोजना
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2020 00:30 IST2020-03-14T00:30:12+5:302020-03-14T00:30:34+5:30
कोरोनाची धास्ती : घाणेकर, गडकरीतील कार्यक्रम रद्द

Corona Virus: ‘गडकरी’ला कोरोनाचे कुलूप; गर्दी टाळण्यासाठी केल्या उपाययोजना
ठाणे : कोरोना व्हायरसचा संसर्ग टाळण्यासाठी गर्दीची ठिकाणे टाळा, मोठे कार्यक्रम घेऊ नका, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे. याचा परिणाम ठाण्यातील गडकरी रंगायतन आणि डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहातील कार्यक्रमांवर झाल्याचे दिसून आले आहे.
घाणेकर नाट्यगृहात विविध संस्थांचे मार्च आणि एप्रिल महिन्यातील दहा कार्यक्रम आयोजकांनी स्वत:हून पुढे ढकलले आहेत. याशिवाय गडकरी रंगायतनमधील दोन कार्यक्रम रद्द झाले आहेत.
कोरोनाचा धसका सर्वांनीच घेतला आहे. राज्यात कोरोनाचे १५ रुग्ण झाले असून, ठाण्यातही एक रुग्ण आढळला आहे. त्यामुळे पालिकेच्या आरोग्य विभागाने सर्तकतेच्या सूचना केल्या आहेत. या पार्श्वभूमीवर गर्दीचे कार्यक्रम रद्द करण्याचेही आवाहन करण्यात आले होते.
त्यानुसार डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात आयोजित करण्यात आलेले मार्च आणि एप्रिल महिन्यांतील विविध संस्थांचे दहा कार्यक्रम आयोजकांनी स्वत: रद्द केले आहेत. यात काही सांस्कृतिक, तर काही शाळांचे कार्यक्रम, तसेच संगीत कार्यक्रमांसह खासगी कार्यक्रमांचाही समावेश होता.
महिलांचा सत्कार रद्द
गडकरी रंगायतनमध्ये महिलादिनाचे औचित्य साधून ११ महिलांचा सत्कार कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. तो रद्द करुन शुक्रवारी पालिकेतील महापौर दालनात घेण्यात आला. आणखी एक कार्यक्रम आयोजकांनीच रद्द केला आहे.