Corona vaccine: कोरोनाप्रतिबंधक लसीचा एक दिवसाचाच साठा शिल्लक; २०८० डोस उपलब्ध

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2021 00:00 IST2021-03-22T23:59:29+5:302021-03-23T00:00:15+5:30

ठामपा स्थायी समितीत झाला गदारोळ, शिवसेना आणि भाजपच्या नगरसेवकांमध्ये पुन्हा जोरदार शाब्दिक चकमक उडाली. अखेर लस उपलब्ध करून देण्यासाठी आम्हीसुध्दा प्रयत्न करू, असे भाजपच्या नगरसेवकांनी सांगितल्यानंतर हा वाद निवळला.

Corona vaccine: One day's stock balance of corona vaccine; 2080 doses available | Corona vaccine: कोरोनाप्रतिबंधक लसीचा एक दिवसाचाच साठा शिल्लक; २०८० डोस उपलब्ध

Corona vaccine: कोरोनाप्रतिबंधक लसीचा एक दिवसाचाच साठा शिल्लक; २०८० डोस उपलब्ध

ठाणे  : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी लसीकरण सुरू झाले आहे. परंतु मागील काही दिवसांपासून अपुऱ्या लसींमुळे काही केंद्रे पालिकेला बंद करावी लागली आहेत. काही केंद्रे एक ते दोन दिवसआड सुरू असली तरी, प्रत्यक्षात ठाणे महानगरपालिकेकडे एक दिवस पुरेल इतकाच म्हणजे अवघा २०८० डोसचा साठा उपलब्ध असल्याची धक्कादायक माहिती सोमवारी स्थायी समितीच्या बैठकीत उघडकीस आली.

ठाणे  महानगरपालिका हद्दीत मागील काही दिवसांपासून कोरोना लसीकरण केंद्रे बंद केली जात आहेत. या मुद्यावरूनच भाजपचे नगरसेवक भरत चव्हाण यांनी कोपरीतील केंद्र का बंद करण्यात आले, असा सवाल केला. त्यानंतर महापालिकेचे मुख्य वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. राजू मुरुडकर यांनी पालिकेकडे सध्या कोव्हॅक्सिनचे केवळ २ हजार डोस शिल्लक असल्याची माहिती दिली. महापालिका हद्दीत रोजच्या रोज ८ ते १० हजार नागरिकांचे लसीकरण केले जात आहे. परंतु आता लसीचा तुटवडा निर्माण झाल्याने शहरातील काही लसीकरण केंद्रे बंद केल्याचेही त्यांनी सांगितले. काही लसीकरण केंद्रे एक ते दोन दिवसआड सुरू असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

त्यावरून हा तुटवडा का झाला, असा सवाल भाजपचे नगरसेवक कृष्णा पाटील यांनी केला. केंद्र सरकारकडून लसींचा पुरेसा साठा राज्य सरकारला मिळत नाही. त्यामुळे राज्याकडून महापालिकेला कमी साठा येत असल्याचे शिवसेनेचे नगरसेवक राम रेपाळे यांनी सभागृहास सांगितले. यावरून शिवसेना आणि भाजपच्या नगरसेवकांमध्ये पुन्हा जोरदार शाब्दिक चकमक उडाली. अखेर लस उपलब्ध करून देण्यासाठी आम्हीसुध्दा प्रयत्न करू, असे भाजपच्या नगरसेवकांनी सांगितल्यानंतर हा वाद निवळला.

दरम्यान, ठाणे महापालिकेकडे आतापर्यंत १ लाख ६२ हजार ५०० कोव्हिशिल्डचा साठा आला होता. त्यातून ९४ हजार ४२ नागरिकांचे लसीकरण झाले असून, उर्वरित ६३ हजार ६७० लसींच्या साठ्यातून आधी ज्यांना कोव्हिशिल्डची लस दिलेली आहे, त्यांना ती दिला जाणार असल्याची माहिती डॉ. मुरुडकर यांनी दिली. कोव्हॅक्सिनचे आतापर्यंत ३९ हजार २२० डोस उपलब्ध झाले आहेत. त्यातील १८ हजार ३९५ डोस देण्यात आले असून, २०८० डोस शिल्लक आहेत. त्यानुसार आतापर्यंत १ लाख १२ हजार ४४३ नागरिकांचे लसीकरण केल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. हा साठा एक दिवसापुरताच मर्यादीत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. 

आज मिळणार साठा
 लसींचा साठा उपलब्ध व्हावा, यासाठी राज्य शासनाकडे आठवड्यातून तीनवेळा पत्रव्यवहार सुरू असल्याची माहितीही आरोग्य विभागाने दिली. आता पाच लाख डोस मागितले असल्याचेही त्यांनी सांगितले. मंगळवारी दुपारपर्यंत साठा उपलब्ध होईल, असा दावाही त्यांनी केला आहे.

शासनदरबारी पत्रव्यवहार
कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला ठाण्यात चांगला प्रतिसाद मिळत आहे. परंतु मागील काही दिवसांपासून लसींचा साठा अपुरा पडू लागल्याने चिंता वाढली आहे. त्यामुळे साठा वाढवून मिळावा, यासाठी महापौर नरेश म्हस्के यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याशी पत्रव्यवहार केला आहे.

Web Title: Corona vaccine: One day's stock balance of corona vaccine; 2080 doses available

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.