बसचा हॉर्न वाजविल्याच्या रागातून ड्रायव्हरला मारहाण
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2025 22:07 IST2025-07-11T22:07:26+5:302025-07-11T22:07:37+5:30
याप्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून जखमीवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

बसचा हॉर्न वाजविल्याच्या रागातून ड्रायव्हरला मारहाण
उल्हासनगर : कॅम्प नं-३ फॉरवर्ड लाईन चौकात खाजगी कंपनीच्या बस चालकाने हॉर्न वाजविल्याच्या रागातून ड्रायव्हरसह तिघांची लोखंडी रॉडने मारहाण केल्याची घटना गुरुवारी पहाटे ४ वाजता घडली. याप्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून जखमीवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
उल्हासनगर कॅम्प नं-३, अंबरनाथ ते कल्याण रस्त्यावरील फॉरवर्ड लाईन चौकात खाजगी बसच्या समोर दुचाकीवर ऐक तरुण व तरुणी जात होती. त्यावेळी काही दुर्घटना होऊ नये म्हणून बस चालक चंद्रकांत भगवान भोईर यांनी हॉर्न वाजवीला. हॉर्न वाजविल्याच्या रागातून आनंद इंगळे व अश्विनी ससाणे यांनी बस थांबवून बस ड्रायव्हर भोईर यांना शिवीगाळ व पोलीस ठाण्यात तक्रार देण्याची धमकी देऊन लोखंडी रॉडने मारहाण केली. तसेच भोईर यांच्या सोबत असलेले गणेश वाघे व राजू पांढरे यांनाही मारहाण केली. अनिल अशोक चित्रपटगृहा समोर बस येताच ती थांबून इंगळे याने साथीदारांना बोलावून पुन्हा तिघांना मारहाण केली. यामध्ये भोईर गंभीर जखमी झाले असून वाघे व पांढरे हेही जखमी झाले. सुरवातीला त्यांच्यावर मध्यवर्ती रुग्णालयात उपचार केले. त्यानंतर खाजगी रुग्णालयात उपचार करण्यासाठी त्यांना भरती केले.
अनिल-अशोक चित्रपटगृहा समोर मारहाण होत असताना, मध्यवर्ती पोलीस घटनास्थळी पोहचून अश्विनी ससाणे व आनंद इंगळे यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांच्यासह साथीदारावर गुन्हा दाखल केला. गुरुवारी पहाटे ४ वाजता मारहाणीची घटना घडली असून असे प्रकार फॉरवर्ड लाईन व अनिल-अशोक चित्रपटगृहा बाहेरील रस्त्यावर नेहमी घडत असल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली. याप्रकरणी अधिक तपास मध्यवर्ती पोलीस करीत आहेत.