भिवंडीत आग लागण्याचे सत्र सुरूच; केमिकल गोदामाला लागली भीषण आग
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2021 15:26 IST2021-04-27T15:26:01+5:302021-04-27T15:26:41+5:30
Fire Case : या आगीत संपूर्ण केमिकल गोदाम जळून खाक झाले आहे. अग्निशन दलाने घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळविले आहे.

भिवंडीत आग लागण्याचे सत्र सुरूच; केमिकल गोदामाला लागली भीषण आग
नितिन पंडीत
भिवंडी ( दि . २७ ) भिवंडीतआग लागण्याचे सत्र थांबता थांबत नसून गोदाम पट्यातील पूर्णा गावात असलेल्या सिमला कंपाऊंड येथे केमिकल गोदामाला भीषण आग लागल्याची घटना मंगळवारी दुपारी घडली आहे. या आगीत संपूर्ण केमिकल गोदाम जळून खाक झाले आहे. अग्निशन दलाने घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळविले आहे .
पूर्णा गावात असलेल्या सिमला कंपाउंड येथील गेला नंबर १२ येथे विनोद तिवारी यांचे केमिकल गोदाम असून या गोदामात अमोनियम क्लोराईड, कॅल्शियम कार्बोनेट, पीव्हीसी पावडर,स्टोनिक ऍसिड , हायड्रोजन अशा वेगवेगळ्या प्रकारचे केमिकल साठवून ठेवले होते. दुपारी अचानक या केमिकल गोदामाला भीषण आग लागल्याने परिसरात एकच खळबळ उडाली होती. विशेष म्हणजे या केमिकल गोदामाच्या बाजूला केमिकलचा इतरही अनेक गोदामे असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी भिवंडी अग्निशमन दलाची एक गाडी घटनास्थळी दाखल होत तब्बल दोन तासांच्या अथक प्रयत्नानंतर फोमच्या साहाय्याने अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळविले आहे . हि आग नेमकी कशामुळे लागली याची अधिकृत माहिती मिळालेली नाही मात्र भिवंडीतील पूर्णा व इतर अनेक रहिवासी ठिकाणी केमिकल साठविण्यास बंदी असतानाही केमिकल मालक अवैध पद्धतीने केमिकल ची साठवणूक करत असल्याने या केमिकल गोदामांना आग लागल्याच्या घटना नेहमीच घडत असतात मात्र स्थानिक पोलीस व महसूल प्रशासन या केमिकल गोदामांवर कोणतीही कारवाई करतांना दिसत नाही. या आगीची नोंद नारपोली पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे