नियंत्रण सुटल्याने ठाण्यात कारला अपघात : चालक जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2018 21:07 IST2018-11-07T20:59:49+5:302018-11-07T21:07:04+5:30
सुसाट वेगाने जाणाऱ्या कारवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार दुभाजकाला आदळून झालेल्या अपघातामध्ये चालक जिमी जोन हे गाडीतील एअर बॅगमुळे अगदी सुदैवाने बचावले. ते किरकोळ जखमी झाले असून त्यांच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.

एअर बॅगमुळे बचावला प्राण
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : घोडबंदर रोडवर पातलीपाडा उड्डाणपुलावरून जाणा-या कारचे नियंत्रण सुटल्याने कारचालक जिमी जोन हा जखमी झाल्याची घटना बुधवारी दुपारी १.३० वा.च्या सुमारास घडली. ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने घटनास्थळी धाव घेऊन याठिकाणी मदतकार्य केले.
घोडबंदर रोडने ही कार ठाण्याच्या दिशेने येत होती. भरधाव वेग असल्याने चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे दुभाजकाला धडक देऊन ती विरुद्ध दिशेने ठाणे ते घोडबंदरच्या बाजूकडे फेकली गेली. सुदैवाने गाडीची एअरबॅग ओपन झाल्यामुळे ते या अपघातातून बचावले असले, तरी किरकोळ जखमी झाले. यानंतर, गाडीतून उतरून ते चालत जाऊन एका खासगी रुग्णालयात दाखल झाले. या अपघातामुळे गाडीच्या आॅइलची टाकी फुटून ते रस्त्यावर सांडले होते. ठाणे अग्निशमन दल आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाने याठिकाणी मदतकार्य राबवून कार आणि आॅइलची सफाई केल्याची माहिती सूत्रांनी दिली.