ठाण्यातील धवल छाया बंगल्याला आग; दुसऱ्या मजल्यावरील मालकाची सुखरुप सुटका
By जितेंद्र कालेकर | Updated: November 17, 2022 19:29 IST2022-11-17T19:28:13+5:302022-11-17T19:29:49+5:30
ठाण्यातील धवल छाया बंगल्याला आग लागल्याची घटना घडली.

ठाण्यातील धवल छाया बंगल्याला आग; दुसऱ्या मजल्यावरील मालकाची सुखरुप सुटका
ठाणे: येथील राम मारुती रोड, राजवंत ज्वेलर्सच्या पुढे असलेल्या धवल छाया या बंगल्याच्या दुसऱ्या मजल्यावर गुरुवारी दुपारी ५.४५ वाजण्याच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली. यावेळी दुसऱ्या मजल्यावर अडकलेले बंगल्याचे मालक वीर धवल घाग (६८) यांना सुखरूपरित्या बाहेर काढण्यात ठाणे अग्निशमन दलाला यश आले. दरम्यान, ही आगही नियंत्रणात आल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली.
राम मारुती रोड वर वीर धवल घाग यांच्या मालकीचा तळ अधिक दोन मजली बंगला आहे. याच बंगल्याच्या दुसऱ्या मजल्यावर आग लागल्याची माहिती मिळताच, घटनास्थळी नौपाडा पोलीस, आपत्ती व्यवस्थापन विभागाचे अधिकारी यांच्यासह अग्निशमन दलाचे अधिकारी आणि जवान तीन फायर वाहन तसेच एका रेस्क्यू वाहनासह दाखल झाले. बंगल्याचे मालक घाग हे अडकल्याचे समजताच, अग्निशमन दलाच्या जवानांनी व आपत्ती व्यवस्थापन कर्मचाऱ्यांनी मोठया कौशल्याने त्यांना सुखरूप बाहेर काढले. ही आग आटोक्यात आणण्यासाठी शथीर्चे प्रयत्न केल्यानंतर ती आग नियंत्रणात आली. यामध्ये कोणालाही दुखापत झाली नसल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली.